इराण्यांच्या उपद्रवामुळे लष्कराला पाचारण? पोलिसांवर हल्ले केल्याचा पूर्वेतिहास असल्याने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:13 AM2017-11-04T04:13:26+5:302017-11-04T04:13:49+5:30
आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली या ठिकाणी असलेला पादचारी पूल जीर्ण झालेला असल्याने त्याठिकाणी लष्कराच्या मदतीने ९० दिवसांत पादचारी पूल उभारला जाणार आहे. एल्फिन्स्टन रोड व करी रोडचा रेल्वे पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे तेथील गर्दी व त्या परिसरातील कार्यालयांमुळे पुलाची तातडीने असलेली गरज यामुळे समजू शकतो. मात्र, आंबिवलीचा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे जवळील इराणी टोळीकडून या कामाला होणारा विरोध किंवा बांधकाम साहित्याची चोरी होण्याची संभाव्य भीती हे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील या भागात बेकायदा बांधकामे आहेत. स्टेशन परिसराला लागून इराण्यांची वस्ती आहे. या टोळीकडून अनेकदा कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले झालेले आहे. दुचाकी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांनी ‘मोक्का’खाली कारवाई केली आहे.
दरम्यान, लष्कराच्यावतीने गुरुवारपासून आंबिवली स्टेशन परिसरात पूल उभारणीकरिता मोजमाप करण्यास सुरुवात झाली. आंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या १० हजारांच्या घरात आहे. आंबिवली स्थानकातील पादचारी पूल कल्याण दिशेला आहे. कसारा दिशेला पादचारी पूलच नाही. कसाºयाच्या दिशेला पादचारी पूल असावा, अशी प्रवासीवर्गाची मागणी आहे. नव्या पुलामुळे काहींच्या जागा बाधित होणार असल्याने पुलाला विरोध होत आहे. जुना पूल २० वर्षांपूर्वी बांधला आहे.
आंबिवली स्थानकात पादचारी पूल बांधण्याची मागणी होती. शहाड, टिटवाळा रेल्वे स्थानकांतही पादचारी पुलाची गरज आहे. पुलाच्या कामाला कोणाचा विरोध नाही. - नरेंद्र पवार,
भाजपा आमदार, कल्याण पश्चिम
गाळेगाव, मोहने, अटाळी या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने आंबिवली स्थानकातून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाई खाडीपूल पडला, तेव्हा सैन्याची मदत घेऊन खोणी-तळोजा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले होते.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली
आंबिवलीचा पूल लष्कराकडे देण्याचे कारण त्याठिकाणी असलेली इराणी वस्ती हे असू शकते. त्यांच्या टोळीचा उपद्रव आहे. रेल्वे इंजिनीअर्सचे काम अत्यंत बकवास असते. रेल्वे टक्केवारीने पोखरली आहे.
- मनोहर शेलार,
प्रवासी महासंघाचे पदाधिकारी