सेना सक्षम, पण युतीवर गणित अवलंबून; युतीत फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:12 AM2019-09-11T00:12:39+5:302019-09-11T00:13:17+5:30

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली

The army is capable, but relies on mathematics on the Alliance; Shiv Sena gains more in BJP than BJP | सेना सक्षम, पण युतीवर गणित अवलंबून; युतीत फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच

सेना सक्षम, पण युतीवर गणित अवलंबून; युतीत फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच

Next

नितीन पंडित 

भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर तब्बल २५ वर्षे भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९0 पासून २0१४ पर्यंत भाजपचे विष्णू सवरा सलग पाचवेळा निवडून आले होते. मात्र १ ऑगस्ट २0१४ रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळे २0१४ च्या निवडणुकीत सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्र मगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. जिल्हा विभाजनाबरोबरच युतीतही बिनसल्यामुळे २0१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपकडून स्वत:च्या ताब्यात घेतला. सद्य:स्थितीत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली तरी, युतीमुळे त्याचा फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच जास्त होणार आहे.

१९८0 ते १९९0 या दहा वर्षांच्या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे शंकर गोवारी हे या मतदारसंघाचे आमदार होते. १९९0 च्या निवडणुकीत विष्णू सवरा यांनी काँग्रेसच्या लक्ष्मण दुमाडा यांचा १२ हजार ५२८ मतांनी पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडे खेचून घेतला. त्या निवडणुकीत विष्णू सवरा यांना ४८ हजार १८४, तर काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा यांना ३५ हजार ६५६ मते मिळाली होती. काँग्रेसकडून खेचून घेतलेला हा मतदारसंघ तब्बल २५ वर्षे भाजपकडेच होता. मधल्या काळात भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही.

२0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीचं गणित बिनसल्याने शिवसैनिकांनी करो या मरोची लढत देत या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध केले. त्यावेळी शिवसेनेचे शांताराम मोरे हे ९ हजार १६0 च्या मताधिक्क्याने निवडून आमदार झाले. भाजपचे शांताराम पाटील यांनी सेनेला कडवी टक्कर देत ४७ हजार ९२२ मतं मिळवली होती.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ देऊनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेनेवर ताशेरे ओढणाऱ्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ताकद दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने प्रयत्न केले. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने २0१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष देऊन हा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेने खेचून घेतला. २0१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने ग्रामीण मतदारसंघात आपली पकड मजबूत करत, ग्रामपंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले. यावेळी मात्र या मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. युतीच्या विजयाची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. युती झाली तर हा मतदारसंघ पुन्हा सेनेच्याच वाट्याला येणार असून, मागील पाच वर्षांत सेनेने या मतदारसंघात केलेली कामे, त्यामुळे पक्षाची वाढलेली ताकद याचा फायदा या निवडणुकीत सेनेला होणार आहे.

विशेष म्हणजे, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कपिल पाटील यांनी भाजप प्रवेश करून खासदारकी मिळवली. कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशापासून राष्ट्रवादीची झालेली वाताहत आजही सुरूच आहे. कपिल पाटलांनी विष्णू सवरा यांची उणीव भरून काढण्याचे काम करत या मतदारसंघात भाजपला मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना, भाजपविरोधात लढलेल्या राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचे काम कपिल पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ व मनसेचे दशरथ पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची वाताहत झाली असून, याचा फायदाही भाजपला होत आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी भाजपने काही डावपेच आखलेत.

मात्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत युती करताना भाजपने दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदारसंघावर पाणी फेरावे लागणार आहे. शिवसेनेसाठी हा मुद्दा फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: The army is capable, but relies on mathematics on the Alliance; Shiv Sena gains more in BJP than BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.