बेकायदा बांधकामप्रकरणी सेना नगरसेवकांचा संताप; कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:56 PM2019-08-09T23:56:00+5:302019-08-09T23:56:10+5:30
२०० खोल्यांच्या चाळी, आठ मजली इमारत राहिली उभी
कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात डोंबिवली पश्चिमेतील सरकारी जमिनींवर २०० खोल्यांच्या चाळींचे बांधकाम झाले आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच एका आठ मजली बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.
म्हात्रे म्हणाले, ‘आचारसंहितेच्या काळात २०० खोल्यांच्या चाळींचे बेकायदा बांधकाम झाले आहे. याच चाळींना २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला आलेल्या पुराचा फटका बसला. महापालिकाही या प्रकाराला जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे अभय असल्यानेच खाडीकिनारी चाळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा. चाळींतील २०० खोल्या आणि आठ मजली इमारत उभी राहिल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘बेकायदा चाळी व इमारतींमधील घरे नागरिकांना कमी किमतीत विकली जातात. त्यामुळे त्यात नागरिकांची फसवणूक होते. यंदा अशाच नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. एक तर या बेकायदा चाळी व इमारतींवर हातोडा चालवावा, अन्यथा पुरात बाधित झालेल्या नागरिकांना इमारतींमधील घरे द्यावीत, याचा प्रशासनाने विचार करावा.’
सभेला बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी संबंधित प्रभाग अधिकाºयांकडून याविषयीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिले आहेत.
टाउनशिपच्या जागेवरही बेकायदा बांधकामे
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर सापर्डे, उंबर्डे, वाडेघर या परिसरांत महापालिका कोरियन कंपनीच्या गुंतवणुकीच्या आधारे ७०० हेक्टरवर विकास परियोजना (टाउनशिप) उभारणार आहे. त्याचा इरादा सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, योजनेच्या प्रस्तावित जागेवरही चाळी उभारल्या जात आहेत. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा मुद्दा स्थायी समिती सदस्य जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. यासंदर्भात नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे व प्रभाग अधिकाºयांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या.