लष्कराने अवघ्या ९ मिनिटात पादचारी पूलाचे टाकले गर्डर, भारत माता की जय च्या घोषणांनी दुमदुमले आंबिवली स्थानक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:45 PM2018-01-18T19:45:29+5:302018-01-18T19:46:06+5:30
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले.
डोंबिवली - मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले. ३१ जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल हा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. भारतीय लष्कराचे कौशल्य बघून प्रवाशांनीही जवानांना मनोमन सलामी दिली.
सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजता रेल्वेने कल्याण ते आसनगाव मेगाब्लॉक जाहीर केला होता. त्यानूसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी वगार्ने प्रथम ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करत ती खाली घेतली त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता जवानांनी क्रेनच्या मदतीने गर्डर बसविण्याचे काम सुरू केले. केवळ अवघ्या नऊ मिनिटात रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानेअन्य तांत्रिक कामांना सुरुवात केली. हा पादचारी पूल कसारा दिशेला बांधण्यात येत असून त्याची लांबी सुमारे १८.२९ मीटर असून रुंदी ५ मीटर आहे.
काम झाल्यावर दुपारी तीन वाजता कल्याण ते आसनगाव लोकल पूर्वरत सुरू करण्यात आल्या. एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या धर्तीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी आंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणा-या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला २० नोव्हेंबर पासून सुरवात केली होती. त्यासाठी लष्कराचे ३९ अधिक जवान काम करत असल्याचे सांगण्यात आले.
या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आले होते, ते पुन्हा बांधणार का?असा सवाल प्रवाशांनी प्रशासनाला केला असून प्रवासी संघटना त्याचा पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. नवीन पादचारी पूल ५० टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पाय-या बांधण्यात येणार आहेत.
मिशन पूर्ण रेल्वे स्थानकातील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण होताच भारतीय लष्कराच्या जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा देत मिशन पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. कल्याण ते आसनगाव मार्गावर रेल्वे ने मेगाब्लॉक जाहीर केल्याने, कल्याण ते टिटवाळा केडीएमटी बस सेवा सोडल्या होत्या. त्यासाठी केडीएमटी महाव्यस्थापक देविदास टेकाळे यांनी श्याम पष्टे, संदीप भोसले समवेत दहा अधिका-यांसह चालक-वाहक अशी रचना लावली होती. त्यानूसार तीन पर्यंत कल्याण ते टिटवाळा या दरम्यान सुमारे ५० फे-यांमधून तीन हजार प्रवाशांनी लाभ घेतल्याचेही सांगण्यात आले. ब्लॉक घेणार असल्याचे रेल्वेने आधीच जाहिर केले होते त्यामुळे कसारा, खर्डी, तसेच आसनगाव मार्गावरील बहुतांशी प्रवाशांनी पहिल्या सत्रातच कल्याण-मुंबईच्या दिशेने प्रवास करत होणारी अडचण टाळली. तसेच दुपारी रेल्वेसह लष्करानेही काम वेळेत केल्याने मेगाब्लॉक संपला, त्यामुळे संध्याकाळी परतणा-या प्रवाशांची गैरसोय टळली.