रिक्षाचालकांना सैन्यच वठणीवर आणेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:47 AM2019-12-23T00:47:01+5:302019-12-23T00:47:25+5:30

कल्याण- डोंबिवली शहरांचा विचार करता हे परिक्षेत्र कल्याण आरटीओ अंतर्गत येते.

Army will bring rickshaw operators on board! | रिक्षाचालकांना सैन्यच वठणीवर आणेल!

रिक्षाचालकांना सैन्यच वठणीवर आणेल!

Next

कायदा रिक्षा चालवणाऱ्यांकडे आरटीओ आणि वाहतूक प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असताना रिक्षाचा प्रवासही आता असुरक्षित झाल्याची प्रचिती वारंवार घडणाºया घटनांमधून येत आहे. रिक्षातून प्रवास करणाºया एका प्रवासी जोडप्याकडील ऐवज सहप्रवाशाने लुबाडल्याची घटना नुकतीच डोंबिवली पूर्वेत घडली आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानीही काही केल्या कमी होताना दिसत नाही. सामान्य प्रवासी यात दररोज भरडला जात असताना मागील आठवड्यात महिला पत्रकारांनाही रिक्षाचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. कल्याण असो किंवा डोंबिवली शहरात बेशिस्तीचे, उध्दट वर्तनाचे आणि भाडेवसुलीच्या माध्यमातून ‘लुटालुटी’चे प्रकार सर्रास सुरू असल्याने यात प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालक नाहक बदनाम होत आहे. परंतु संबंधित प्रशासकीय यंत्रणा गप्प का? असाही सवाल उपस्थित होत आहे. एकूणच हे चित्र पाहता रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आता काय सैन्याला आणायचे का? अशीच म्हणण्याची वेळ कल्याण-डोंबिवलीकरांवर आली आहे.

कल्याण- डोंबिवली शहरांचा विचार करता हे परिक्षेत्र कल्याण आरटीओ अंतर्गत येते. या दोन शहरांसह उल्हासनगर, अंबरनाथ ते बदलापूरपर्यंतचा परिसरही या कल्याण आरटीओच्या अखत्यारित येतो. कल्याण आरटीओ परिक्षेत्रात सुमारे ५० हजार रिक्षा आहेत. यातील २० हजाराच्या आसपास रिक्षा या कल्याण- डोंबिवलीत आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढतच आहे. नवीन परवाना वाटप थांबवा अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे, परंतु सरकारने परवाना देणे सुरूच ठेवल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे.

डोंबिवली शहराचा आढावा घेता याठिकाणी रिक्षांची संख्या सुमारे ८ हजार आहे. पूर्व-पश्चिमेला स्थानक परिसरात तब्बल १५ रिक्षातळ आहेत. यातील बहुतांश तळ हे बेकायदा आहेत. हे तळ आजच्याघडीला वाहतुकीच्या मूळावर उठले आहेत. विशेष बाब म्हणजे जेवढे मंजूर तळ आहेत त्यावर मंजूर संख्येपेक्षा दुप्पट संख्येने रिक्षा उभ्या केल्या जातात. मनमानीपणे रिक्षांच्या रांगा लागत असल्याने रेल्वेस्थानक परिसराला एकप्रकारे बकालपणा आला आहे. याठिकाणी बेकायदा उभ्या राहिलेल्या रिक्षातळाने तर पूर्णत: पसारा मांडला आहे. येथे ‘चौकात चहुकडे रिक्षातळ’ असे काहीसे चित्र पाहावयास मिळते. दरम्यान, प्रवाशांची गरज असल्याचे कारण पुढे करीत आरटीओकडूनही याकडे कानाडोळा केला जात असल्याने त्या विभागाचेही एकप्रकारे या बेकायदा तळाला अभय मिळाले आहे. रेल्वेस्थानक परिसरात मोठया प्रमाणावर रिक्षातळ असूनही संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस कामावरून घरी परतणाºया प्रवाशांसाठी किती रिक्षा उपलब्ध होतात याची शहानिशा संबंधित यंत्रणेने केली आहे का हाही संशोधनाचा विषय आहे.
शहरात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात स्थानक परिसरात रिक्षांची दाटीवाटी दिसून येते परंतु सायंकाळच्या सुमारास ही संख्या नगण्य असते त्यामुळे कामावरून घरी परतणाºया चाकरमान्यांचे पुरते हाल होतात. ‘सकाळी रिक्षांचा पसारा सायंकाळी मात्र गायब’ असे चित्र कायम असते. यात शेअरनेच प्रवास करण्याची सक्ती केली जात असल्याने यात प्रवाशांची गैरसोय होते. जादा प्रवासी वाहतूक ही नित्याचीच बाब झाली असून याकडे वाहतूक पोलिसांचा होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे.
मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याचा अभाव दिसत असल्याने चालकांच्या मुजोरीत मोठा आर्थिक भूर्दंड प्रवाशांना सोसावा लागत आहे. केवळ लांबची भाडी स्वीकारायची व जवळच्या अंतरावर जाणाºया प्रवाशांसोबत उर्मटपणे वागायचे. मनाला येईल ते भाडे मागायचे अशी मनमानी रिक्षाचालक करत आहेत. याचा प्रत्यय गेल्या आठवडयात दोन महिला पत्रकारांनाही आला. त्यांच्याशी उध्दट वर्तन करताना ‘‘काय करायचे ते कर मी बघून घेतो’’ अशी धमकीही रिक्षाचालकाने दिल्याने महिला सुरक्षित आहेत का? असाही सवाल या घडलेल्या प्रकाराच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशाप्रकारे मनमानी आणि मुजोरीचा अनुभव रिक्षाचालकांकडून येत असताना स्थानक परिसरातील कोंडीलाही रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा हातभार लागलेला आहे.
पूर्वेला स्कायवॉकच्या ठिकाणी एकाला एक खेटून रिक्षा उभ्या करून ते नागरिकांचा स्कायवॉककडे जाण्याचा मार्गही अडवत आहेत.

मोटार वाहन कायद्याप्रमाणे भाडे नाकारणाऱ्यांविरोधात आमची कारवाई सुरूच असते. पत्रकार महिलांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्या संबंधित रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच गणवेश नसणे, बॅज नसणे अशा बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात सातत्याने कारवाई सुरूच असते. ज्यांना परवान्यांचे वाटप करण्यात आले तेच रिक्षा चालवतात का? याचा तपास आरटीओने करणे गरजेचे आहे.
- सतेज जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक शाखा

जे रिक्षाचालक बेशिस्तपणे वागतात त्यांच्यावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे. अशा रिक्षाचालकांना रिक्षा संघटनांनीही पाठीशी घालता कामा नये. अशावेळी पोलिसांच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे. गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांमुळे प्रामाणिक पणे व्यवसाय करणारे रिक्षाचालकही हैराण आहेत. एकीकडे व्यवसाय तोटयात चालत असताना दुसरीकडे अशा प्रवृत्तींमुळे व्यवसाय नाहक बदनाम होत आहे. याची गांभीर्याने दखल घेणे काळाची गरज आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशांना रिक्षापरवाने देऊ नयेत
- मनोज वाघमारे, रिक्षाचालक, कल्याण

महिला प्रवाशांना बºयाच वेळेला रिक्षाचालकांकडून उद्धट आणि मनमानीला सामोरे जावे लागते. प्रवासी भाडे नाकारण्याचे प्रकारही घडतात. संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले जाते. पण कोणतीही सुधारणा होत नाही हे वास्तव आहे. मनमानी करण्याºया रिक्षाचालकांचे परवाने रद्द करणे हाच एक पर्याय आता उरला आहे.
- कांचन क्षीरसागर, प्रवासी, डोंबिवली

रिक्षाचालकांचा प्रश्न कल्याण-डोंबिवलीत गंभीर झाला आहे. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आरटीओ, वाहतूक पोलिसांचा धाक राहिलेला नाही. धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा रिक्षाचालकही भरडला जात आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रातील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर ‘लोकमत’चे प्रतिनिधी प्रशांत माने, पंकज पाटील आणि सदानंद नाईक यांनी प्रकाश टाकला आहे.

Web Title: Army will bring rickshaw operators on board!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.