अपक्षांची एकत्रित मते ‘नोटा’च्या आसपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:05 AM2019-05-25T00:05:36+5:302019-05-25T00:05:39+5:30
कल्याण लोकसभा मतदारसंघ : रिंगणातील १५ अपक्ष विजयापासून राहिले कोसो दूर
कल्याण : लोकसभेच्या कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवार हे अपक्ष होते. परंतु, त्यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या ही १४ हजार २२६ इतकी आहे. तर, ‘नोटा’ला जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा केवळ एक हजाराने अपक्षांच्या मतांची संख्या अधिक आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले होते. त्यावेळी सात उमेदवार अपक्ष होते. तेव्हा अपक्षांना एकूण १० हजार ६९५ च्या आसपास मते होती. ती त्यावेळच्या विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या (दोन लाख ५० हजार ७४९) कोसो दूर होती. यंदा २८ उमेदवारांमध्ये १५ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.
२००९ आणि २०१४ ला मिळालेली सुमार मते पाहता २०१९ ला अपक्ष उमेदवार किती मते मिळवतात, याकडे लक्ष लागले होते. परंतु, यंदाही त्यांचा प्रभाव दिसला नाही. त्यांच्या मतांची एकूण आकडेवारी पाहता यंदाही ती विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या (तीन लाख ४४ हजार ३४३) कोसो दूरच राहिली. अपक्षांना मिळालेल्या एकत्रित मतांची आकडेवारी १४ हजार २२६ इतकी आहे. दरम्यान, यंदा ‘नोटा’ला १३ हजार १२ जणांनी पसंती दर्शवली आहे. ‘नोटा’ आणि अपक्षांना मिळालेल्या मतांचा फरक काढता, तर तो एक हजार २१४ मतांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाही अपक्ष उमेदवाराला ‘नोटा’ला जेवढी मते मिळाली, त्याच्याजवळही पोहोचता आलेले नाही. २०१४ मध्ये नऊ हजार १८५ जणांनी ‘नोटा’चा वापर केला होता.
नोटाचा वापर
रिंगणातील कोणताच उमेदवार आपल्या पसंतीचा नाही, या दाखवण्यासाठी नोटाच्या बटणाचा उपयोग केला जातो.