खून व जबरी चोरीतील गुन्हेगाराला 19 वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 06:22 PM2019-05-03T18:22:33+5:302019-05-03T18:24:00+5:30
कोयना पोलीस गेल्या 19 वर्षांपासून त्याचा शोध घेत असून या गुन्ह्यातील तिघांना यापूर्वी 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : खून व जबरी चोरीतील एका फरार आरोपीला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल 19 वर्षानंतर जेरबंद करून सातारा कोयना पोलिसांच्या स्वाधीन केले. कोयना पोलीस गेल्या 19 वर्षांपासून त्याचा शोध घेत असून या गुन्ह्यातील तिघांना यापूर्वी 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना खून व जबरी चोरीतील एक फरार आरोपी गेल्या 19 वर्षांपासून लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक गेली महिनाभर त्याच्या मागावर होते. गुरुवारी 2 मे रोजी सदर आरोपी कर्जत येथील भिसेगाव बस स्टॅन्डवर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा लावण्यात आला. सदर आरोपी बस स्टँडवर येताच त्याला जेरबंद करण्यात आले. सुरेश भीमा गोर असे आरोपीचे नाव असून त्याने खून व जबरी चोरीची कबुली दिली. त्याला कोयना पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख तरडे यांनी दिली.
आरोपी सुरेश गोर याने साथीदाराच्या मदतीने 8 ऑगस्ट 2001 मध्ये सातारा कोयना आंबेनळी घाटात एका मालवाहू ट्रकच्या समोर मारुती कार आडवी लावली होती. चाकू व लोखंडी सळईचा धाक दाखवून ट्रक चालक, क्लिनर व एका प्रवाशाचे हात पाय बांधून खोल दरीत ढकलून दिले. तर ट्रक मधील 9 लाख 31 हजाराचे हमाम व लाईफबॉय साबणाचा माल चोरून नेला. दरीत ढकलून दिलेल्या पैकी ट्रक चालक व प्रवाशाचा मृत्यू झाला. तर ट्रक क्लिनर वाचल्याने, त्याच्या तक्रारीवरून कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये तिघांना अटक करून त्यांना 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. तर सुरेश भोर गेल्या 19 वर्षांपासून फरार होता.