मुंबईच्या व्यापा-याला धमकवणा-याला अटक, आरोपी सराईत गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:20 AM2017-11-20T01:20:28+5:302017-11-20T01:20:38+5:30
एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळणा-या ठाण्यातील एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली.
ठाणे : धान्याचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने, अडचणीत सापडलेल्या मुंबई येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळणा-या ठाण्यातील एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली. आरोपीला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वस्त धान्याचा काळाबाजार केल्याच्या गुन्ह्यामध्ये मुंबईतील साकीनाका येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव समोर आले होते. या गुन्ह्यामध्ये संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे वाहन वापरण्यात आले होते. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात नेहमी जाणे-येणे असणाºया या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची माहिती चरई येथील एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंजजवळ राहणाºया महेश अमृतलाल ठक्कर याने काढली. त्यानंतर, महेश ठक्करने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास धमक्या देणे सुरू केले. तुमचे सगळे धंदे मला माहीत आहेत. तुमच्याकडे २० गाड्या आहेत. त्या कशा घेतल्या, हेसुद्धा मला माहीत आहे, असे धमकावून महेशने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सांगितल्यानंतर, महेशने २० लाख रुपयांची मागणी केली. खंडणी न दिल्यास पोलिसांना सांगून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्याची धमकीही महेशने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास दिली. व्यावसायिकाने पुन्हा विनवण्या केल्यानंतर, अखेर १० लाख रुपयांची खंडणी देण्याचे निश्चित झाले. त्यापैकी दीड लाख रुपये रोख व्यावसायिकाने महेशला दिले. उर्वरित ८ लाख ५० हजार रुपये देण्यासाठी शनिवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता. खंडणीची रक्कम घेण्यासाठी कापूरबावडी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये महेश ठक्कर शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येणार होता. तत्पूर्वी या व्यावसायिकाने ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी याची पडताळणी केली. आरोपी महेश ठक्कर याच्याविरुद्ध आधीच ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.