खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकी देणा-या गुंडाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 09:24 PM2020-02-26T21:24:25+5:302020-02-26T21:27:42+5:30
लोकमान्यनगर भागात रिक्षा चालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना खंडणीसाठी धमकावणाºया सुनिल गवळी उर्फ कोडया याला वर्तकनगर पोलिसांनी पुन्हा खंडणीच्या गुन्हयात अटक केली आहे. एका स्थानिक व्यापा-याकडून एक हजारांची खंडणी उकळण्यासाठी त्याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकमान्यनगर येथील एका व्यापा-याला एक हजारांच्या खंडणीसाठी मारहाण करून ठार मारण्याची धमकी देणा-या सुनील गवळी ऊर्फ कोड्या (३४, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-४ येथील रहिवासी रामसेवक सरोज (५८) हे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात साफसफाई करीत होते. त्यावेळी सुनील याने त्यांच्याकडे एक हजारांची मागणी केली. त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्तीने दुकानात शिरकाव करून सामानाची तोडफोड केली. टेबलमधील पैशांचा गल्लाही बाहेर काढून त्याने फेकून दिला. त्याला सरोज यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर यात कोणी मध्यस्थी केली तर तुम्हाला बघून घेईल, अशी धमकीही त्याने तिथे जमलेल्या लोकांना दिली. शिवाय, पोलीस तक्रार केल्यास जेलमधून सुटून आल्यानंतर मारून टाकेल, अशी धमकीही त्याने दिली. दुकान चालवायचे असेल, तर एक हजारांची खंडणी द्यावीच लागेल, असा दम त्याने त्यांना भरला. हा सर्व प्रकार सुरू असतानाच तिथे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील एक पथक तिथे आले. त्यांनी त्याला तातडीने अटक केली.
* दहशत पसरविण्याची जुनी खोड
सुनील गवळी ऊर्फ कोड्या याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून लोकमान्यनगर भागातील रहिवासी, रिक्षाचालक तसेच व्यापारी यांच्यावर दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्याकडून तो एक ते पाच हजारांपर्यंतची खंडणी गोळा करतो. ती न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देतो, अशा अनेक तक्रारी आहेत. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात हाणामारी तसेच खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या याच कारवायांमुळे त्याला दोन वर्षांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. त्याची तडीपारी आॅगस्ट २०१९ मध्येच संपल्यानंतर तो पुन्हा हाणामाºया, खंडणी असे प्रकार करण्यासाठी कार्यरत झाल्याने त्याच्यावर कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.