कुख्यात गुन्हेगार विकी भोसलेला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:28 PM2019-02-15T23:28:23+5:302019-02-15T23:35:28+5:30
एका खूनाच्या प्रयत्नामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पसार झाल्यानंतर विक्रांत उर्फ विकी भोसले (३०) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.
ठाणे : कुख्यात गुन्हेगार विक्रांत ऊर्फ विकी भोसले (३०, रा. किसननगर, ठाणे) याला एका खुनाच्या प्रयत्नामध्ये ठाणे खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
विकी तसेच त्याचे साथीदार संतोष पवार, दर्शन अशा चौघांनी २२ आॅक्टोबर २०१५ रोजी ठाण्याच्या आयटीआय सर्कल, रोड क्रमांक २२, वागळे इस्टेट येथे एका वीसवर्षीय तरुणावर तलवार आणि चाकूने खुनी हल्ला केला होता. यात त्याच्या डोक्याला आणि हाताच्या बोटांवर गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या चौघांविरुद्ध दाखल झाला होता. संतोष आणि दर्शन या दोघांना श्रीनगर पोलिसांनी आॅक्टोबर २०१५ रोजी अटक केली होती. मात्र, विकी भोसले हा पोलिसांना हुलकावणी देत होता. तो १३ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाण्याच्या बाळकुम-साकेत पाइपलाइन भागात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून त्याला बाळकुम भागातून अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात हाणामारी, खुनाचा प्रयत्न असे तीन गुन्हे, तर खेड (रत्नागिरी) येथे दोन असे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचाही एका गुन्ह्याचा समावेश असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक बी.पी. बनसोडे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.