तस्करीसाठी कासवांची मागणी करणाऱ्याला वनखात्याने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 06:26 AM2018-09-21T06:26:00+5:302018-09-21T06:26:03+5:30
तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती.
- सुरेश लोखंडे
ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती. या कासवांना आणणारी महिला आजही कोठडीत आहे. तिच्या साहाय्याने तस्करीसाठी या कासवांची मागणी करणाºयास वनखात्याच्या यंत्रणेने नुकतीच कुर्ला येथून अटक केली आहे. तोही सध्या तुरुंगात आहे.
कर्नाटक , आंध्र प्रदेशातून कासवाची ५३० पिल्ले रेल्वेद्वारे कुर्ला येथे आणण्यात आली होती. कासवांच्या या तस्करीची माहिती वनअधिकाºयांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी सापळा रचून कुर्ला टर्मिनसवर कर्नाटकच्या शोपी (३४) या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडले होते. या महिलेकडून अन्यही तस्करीची माहिती मिळविण्यासह कासवांची मागणी करणाºयाचा शोध वनखात्याच्या यंत्रणेने घेतला. यानुसार, या चौकशी पथकाने कुर्ला (पूर्व) येथील जागृतीनगरमधील रहिवासी अब्दुल कादर इमामसाब हान्नुरे यास अटक केली आहे. सध्या तो ठाणे येथील जेलमध्ये असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तस्करीसाठी आणलेल्या या कासवांना कर्नाटकच्या जंगलात सोडण्यासाठी ठाणे न्यायालयाने तत्काळ परवानगी दिली. कर्नाटकमधील हवामानात जगणाºया या कासवांना तेथे सोडणे अपेक्षित असल्यामुळे काही दिवसांनी कर्नाटक न्यायालयाने तशी परवानगी येथील वनखात्याची मिळवली. सुमारे आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस ठाण्यातील वनखात्याचा पाहुणचार घेणाºया कासवांना वनखात्याच्या पथकांनी कर्नाटकमध्ये सोडल्याचे कंक यांनी सांगितले. तत्पूर्वी या कासवांचे मेडिकल करण्यासह त्यांचे सुस्थितीत खानपानही वनखात्याकडून करण्यात आले. आता त्यांना कर्नाटकटला सोडले आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.