म्हाडाची घरे देतो सांगून अनेकांना फसवणाऱ्या ५ जणांना अटक
By धीरज परब | Published: September 21, 2023 11:28 PM2023-09-21T23:28:33+5:302023-09-21T23:29:20+5:30
म्हाडाची हुबेहूब पत्र , शिक्के आदी अनेक मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे .
मीरारोड - म्हाडाच्या इमारतीत स्वस्तात फ्लॅट देतो सांगून तशी कागदपत्रे , रबरी शिक्के आदींचा वापर करून अनेकांची फसवणूक करणारी टोळी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने उघडकीस आणली आहे . म्हाडाची हुबेहूब पत्र , शिक्के आदी अनेक मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे .
मीरारोड येथील म्हाडाच्या इमारतीत फ्लॅट देतो सांगून काही जण लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा १ ला मिळाली . गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे सह राजु तांबे, सचिन हुले, विजय गायकवाड, समीर यादव, सुधीर खोत, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, किरण आसवले यांच्या पथकाने तपास सुरु केला .
म्हाडाचा अधिकारी म्हणून ओळखपत्र दाखवणारा सुजीत दत्ताराम चव्हाण रा. मीरारोड सह जावेद अल्लीशा पटेल, रा. गोरेगाव, मुंबई, मोइनउद्दीन सलीमउद्दीन खान, रा. मीरारोड, अफसर ईशाद शेख रा. मुंब्रा, राजेंद्रप्रसाद राजकारण यादव रा. भाईंदर हे ५ जण भाईंदरच्या राई शिवनेरी येथे शोभा जाधव यांच्या घरी सदनिकेचे पैसे घेण्यास गेले असता पोलीस पथकाने त्या ५ जणांना अटक केली .
शोभा यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांच्या कीर्ती आणि स्वाती या मुलींच्या नावे मीरारोडच्या बालाजी हॉटेल जवळील म्हाडा इमारतीत फ्लॅट देतो म्हणून ८ लाख घेतले होते . तर मुलगा स्वप्नीलच्या नावे फ्लॅट साठी २ लाख घेतले होते व बुधवारी आणखी ४ लाख घेण्यास आले असताना पोलिसांनी पकडले .
राजेंद्रप्रसाद यादव मार्फत शोभा यांची चव्हाण सोबत ओळख झाली होती . २ बीएचके साठी ५० लाख तर १ बीएचके साठी ४० लाखात फ्लॅट देणार होते . आरोपींनी म्हाडाचे म्हणून हुबेहूब पझेशन लेटर , अलॉटमेंट लेटर , करारनामा , तसेच धनादेश घेतल्याचे स्टॅम्प पेपर लिहून दिले . इतकेच काय तर शोभा यांच्या मुलींच्या सदनिकेची कर्ज बाबत पोस्टाने म्हाडाचे पत्र देखील आले.
आरोपीं कडे बनावट रबरी शिक्के मोठ्या प्रमाणात सापडले . बायोमेट्रिक द्वारे त्यांनी सदनिका घेणाऱ्यांची नोंदणी देखील केली होती . आणखी अनेकांची ह्या टोळीने फसवणूक केली असून त्यांचे अन्य साथीदार सुद्धा असल्याने त्यांचा शोध सुरु आहे . अटक आरोपी हे पोलीस कोठडीत आहेत .