अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास अटक
By admin | Published: September 27, 2016 03:32 AM2016-09-27T03:32:13+5:302016-09-27T03:32:13+5:30
लग्नाच्या भूलथापा देऊन भांडुप येथे राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश जाधव (२२, रा. भांडुप) याला मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या
कल्याण : लग्नाच्या भूलथापा देऊन भांडुप येथे राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश जाधव (२२, रा. भांडुप) याला मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने आणि मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ यांनी सापळा रचून दापोली येथून अटक केली आहे.
ऋषिकेशने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आश्वासन दिले. २५ एप्रिल २०१४ ला त्याने तिला ठाणे रेल्वे स्थानकातून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या अजोबांनी ठाणे रेल्वे स्थानकात आपल्या नातीचे अपहरण झाल्याची तक्रारही दिली होती. मात्र, या तपासाला कोणत्याही प्रकारची गती मिळत नव्हती. अखेर, आजोबांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण, कल्याण विभाग आणि मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ यांना संयुक्तपणे तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार, मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण कल्याण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत आणि सहायक पोलीस आयुक्त गाडगीळ यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना भांडुपमधल्या स्थानिक खबऱ्या आणि फेसबुकद्वारे ऋषिकेश दापोली येथे राहत असल्याचे समजले. तेथे सापळा रचून रविवारी ऋषिकेशला अटक केली. (प्रतिनिधी)
मुलगी आजोबांकडे
ऋषिकेश पीडित मुलीसह भाड्याच्या खोलीत राहत होता. तो एका खाजगी कं पनीत नोकरी करत होता. सध्या मुलीला आजोबांच्या स्वाधीन केले आहे. तर ऋषिकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.