कोरोना रजेवर गेला अन् आरोपी फरार झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:04 AM2022-07-09T07:04:00+5:302022-07-09T07:04:24+5:30
कोरोना रजेवर गेलेल्या आरोपीने रजा समाप्त झाल्यानंतर पुन्हा कारागृहात न परतता धूम ठोकल्याचे समोर आले आहे.
भिवंडी : कोरोना रजेवर गेलेल्या आरोपीने रजा समाप्त झाल्यानंतर पुन्हा कारागृहात न परतता धूम ठोकल्याचे समोर आले आहे. कारागृहातील आरोपींना कोरोनाकाळात आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याचाच फायदा घेत भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सद्दाम शफीक शेख ऊर्फ लस्सीवाला हा कोरोना रजेवर गेला, मात्र तो पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी हजर झाला नाही. त्यामुळे तो फरार झाल्याची तक्रार पुणे येथील कारागृह पोलिसांनी नारपोली पोलिसांकडे दिली आहे.
आरोपी येरवडा कारागृहात ही शिक्षा भोगत असताना कोरोनाकाळात २० मे २०२० ते ३० जुलै २०२० या दरम्यान त्याला कोरोना आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. त्यानंतर ती रजा वाढवून २४ मे २०२२ पर्यंत करण्यात आली होती. ही रजा संपल्यानंतर आरोपीने शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात हजर होणे गरजेचे असताना आरोपी तो कालावधी आणि त्यानंतरचा अतिरिक्त १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतरही हजर झाला नाही. कारागृहातून तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास आरोपी शेख ऊर्फ लस्सीवाला हा घरी आढळून न आल्याने कारागृह पोलीस संदीप भांगरे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तो फरार झाल्याची तक्रार दिली आहे.
अशी होती शिक्षा
भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी मोहम्मद सद्दाम शफीक शेख ऊर्फ लस्सीवाला यास २०१७ मध्ये सात वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड, तो न भरल्यास १४ दिवस कारावास, अशी एकत्रित शिक्षा सुनावली होती.