डोंंबिवलीतून १२ लाख ९१ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:02 PM2019-01-03T22:02:23+5:302019-01-03T22:08:18+5:30

डोंबिवलीतील एका व्यापा-याची रोकड त्याच्या नोकराकडून लुटणा-या चौघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

Arrested a gang of robbery of 12 lakh 91 thousand from Dombivli | डोंंबिवलीतून १२ लाख ९१ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाची कारवाई अवघ्या तीन दिवसात मिळाले आरोपीव्यापा-याच्या नोकराने दिली लुटारुंना रकमेची माहिती

ठाणे: डोंबिवलीतील एका स्टील व्यावसायिकाची १२ लाख ९१ हजारांची रोकड लुटणा-या अमोल लोखंडे (२६, रा. उल्हासनगर), विजय अय्यर (२६, बदलापूर), गणेश झेंडे (२६, बदलापूर) आणि गुरिप्रत सिंग (२३, बदलापूर) या चौघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजारांची रोकड आणि जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा १३ लाख सात हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांनी सांगितले.
मानपाडा येथील एका स्टीलच्या व्यापाºयाला गिºहाईकाने दिलेली १२ लाख ९१ हजारांची रोकड घेऊन त्यांचा नोकर २६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास स्कूटरवरुन कल्याण शीळ रोडने काटई टोल नाक्यावरुन जात होता. ही रोकड स्कूटरच्या हँडलला अडकवून जात असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या विजय अय्यर आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीला लाथ मारुन त्याला पाडले. दुचाकीवरुन तो खाली पडल्यानंतर या टोळक्याने दुचाकीच्या हँडलला लटकवलेली रोकडची पिशवी घेऊन अन्य एका दुचाकीवरुन पलायन केले. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा समांतर तपास ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाकडूनही सुरु होता. हा प्रकार अमोल लोखंडे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची टीप उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांना मिळाली होती. त्यामुळे तक्रारदार व्यापाºयाकडे काम करणाºया लोखंडे याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी कसून चौकशी केली. सुरुवातीला आपण त्या गावचेच नसल्याचा त्याने आव आणला. नंतर मात्र त्याला बोलते केल्यानंतर आपल्या इतर साथीदारांना पैसे लंपास करण्यासाठी टीप दिल्याची त्याने कबुली दिली. त्याने इतर तिघांची नावेही दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक गायकवाड आदींच्या पथकाने त्यांना अटक करुन लुटीतील ११ लाख ५७ हजारांची रोकड आणि लुटीसाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. चौघांनाही ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Arrested a gang of robbery of 12 lakh 91 thousand from Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.