उल्हासनगरात उपोषणापूर्वीच केली धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:02+5:302021-07-07T04:50:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने बेकायदा व धोकेदायक इमारतींबाबत घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अमर जोशी व एसव्हीएस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेने बेकायदा व धोकेदायक इमारतींबाबत घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अमर जोशी व एसव्हीएस संघटनेने सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. मात्र, उपोषणाला बसण्यापूर्वीच उपोषणकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. महापालिका आयुक्तांनी मंगळवारी उपोषणकर्त्यांना बैठकीला बोलाविले असले तरी, घरीच उपाेषण करण्याचा निर्धार जोशी यांनी केला आहे.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील इमारत दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर १० वर्षे जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या आहेत, तर ११६ धोकेदायक इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना धीर देण्यासाठी, तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोशी व एसव्हीएस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बेमुदत उपोषणाची हाक दिली होती. मात्र, सकाळी उपोषणाला बसण्यापूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी कोरोना संसर्गाचे कारण देत उपोषणकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान, मागण्या मांडण्यासाठी मंगळवारी आयुक्तांनी बैठक बोलाविल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अमर जोशी, राम वाधवा, शशिकांत कायम आदींनी पोलिसांनी केलेल्या धरपकडीबाबत नाराजी व्यक्त केली.
३० काेटींच्या निधीला मंजुरी
भाजप-रिपाइंच्या मोर्चानंतर धोकादायक इमारतींचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका करणार असल्याचे सांगण्यात आले. इतर इमारतींच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटसाठी १५ संरचनात्मक अभियंत्यांचे पॅनल करण्यात आले आहे. तसेच विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या राहण्याच्या सुविधेसाठी ३० कोटींच्या निधीला महासभेत मंजुरी देण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.