फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:02 PM2019-05-26T23:02:33+5:302019-05-26T23:07:08+5:30
मुंबईच्या पवईतील एकाच कंपनीत कामाला असलेल्या सह कर्मचाºयाने माजी कर्मचारी तरुणीला तिचाच खासगी फोटो व्हॉटसअॅपवर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याची तक्रार दाखल होताच भरत अय्यर याला अखेर नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : नौपाड्यातील एका चोवीसवर्षीय तरुणीला तिचा खासगी फोटो पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या भरत अय्यर (२६, रा. सहारगाव, अंधेरी, मुंबई) याला शुक्रवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पवईतील एका खासगी कंपनीमध्ये ही तरुणी नोकरीला होती. तिथेच भरतही तिच्यासोबत नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी तिने ही नोकरी सोडली. कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या तिच्या लॅपटॉपवर वैद्यकीय कारणासाठी तिने तिचे काही फोटो काढले होते. तिने नोकरी सोडल्यानंतर तो लॅपटॉप भरतला मिळाल्यानंतर त्याने तिचे हे फोटो स्वत:च्या मोबाइलमध्ये घेतले. नंतर, एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्याने तिचे ते ‘खासगी’ फोटो तिच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. हे फोटो पाठवताना तिचा ‘शुभचिंतक’ असल्याचा त्याने त्यावर उल्लेख केला. नंतर, ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. १५ ते २४ मे २०१९ यादरम्यान हा प्रकार घडला. आपलेच फोटो व्हॉट्सअॅपवर आल्याने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या या तरुणीने २४ मे रोजी दुपारी विनयभंगाची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक मोहिनी कपिले, महेश कवळे, हवालदार सुनील अहिरे, संजय चव्हाण आणि पोलीस नाईक दिनेश महाले यांच्या पथकाने अंधेरीच्या सहारगाव भागातून २४ मे रोजी रात्री भरतला अटक केली. त्याचा मोबाइलही जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.