कोकण परिक्षेत्रात सर्वाधिक लाचखोर ठाण्यातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:23 PM2021-01-24T23:23:44+5:302021-01-24T23:29:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत ४४ सापळे लावण्यात आले. यात ६६ लाचखोरांना अटक झाली. यामध्ये सहा विभागातील सर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. तरीही अगदी क्षुल्लक कामांसाठीही सामान्य व्यक्तींची अडवणूक होते. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा विभागांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. २०१९ मध्ये कोकण परिक्षेत्रात १०९ गुन्हे दाखल झाले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी ही घट झाल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृतीसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा २०२० मध्ये ठाणे परिक्षेत्रात एकूण ४३ सापळे लावण्यात आले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये वर्षभरात ६६ लाचखोर सापळयात अडकले. यामध्ये २५ लाचखोरांना ठाण्यातून अटक झाली. त्यापाठोपाठ पालघर विभागात सहा, नवी मुंबई आणि रायगड विभागात प्रत्येकी चार, रत्नागिरीत तीन आणि सिंधुदुर्ग मध्ये एका गुन्हयाची नोंद झाली. यंदाही लाचखोरीत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग अव्वल क्र मांकावर होते. त्यापाठोपाठ पोलीस कर्मचारी लाचेच्या सापळयात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ठाणे विभागाकडून १०९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये १०२ सापळे लाचेचे तर पाच अपसंपदा आणि दोन भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा समावेश होता. यंदा मात्र, लॉकडाऊनमुळे यात घट आली असली तरी नागरिकांनीही भीती न बाळगता तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
‘‘ लाचखोरी ही समाजाला कॅन्सरसारखी पोखरत आहे. ज्याची अडवणूक होते, त्या नागरिकांनीही तक्रारीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे. अनेकदा चिरिमिरीसाठी कामांची अडवणूक होते. पण, नागरिकांनीही तक्रार केली नाही तर एसीबीलाही कारवाई करणे अवघड होते. संबंधित विभागप्रमुखांनीही अशा लाचखोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासकीय कारभार पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. ’’
डॉ. महेश पाटील, अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र.
* २०२० मध्ये विभागनिहाय कारवाई
ठाणे - २५
पालघर - ६
नवी मुंबई - ४
रायगड - ५
रत्नागिरी -३
सिंधुदुर्ग - १
एकूण - ४४
एकूण अटक - ६६