बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 10:04 PM2019-11-05T22:04:48+5:302019-11-05T22:41:02+5:30
विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून आकाश मोरे (२७) या तरुणाचा ठाण्यातील पडवळनगरमध्ये दिवसाढवळया गणेश रेड्डी (२९) याने खून केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली. खूनी गणेशला श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच अटक केली आहे.
ठाणे: बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून आकाश मोरे उर्फ ब्लॅकी (२७, रा. भिमनगर, वर्तकनगर, ठाणे) याचा खून करणा-या गणेश रेड्डी (२९, रा. पडवळनगर, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच मंगळवारी अटक केली. अनेक वेळा इशारा देऊनही आकाशने दुर्लक्ष केल्यानेच आपण त्याचा खून केल्याची कबुली गणेशने पोलिसांना दिली आहे.
मोरे आणि रेड्डी कुटूंबीय हे पडवळनगर भागातच वास्तव्याला आहे. गणेशची बहिण विवाहित असून तिला दोन मुलीही आहेत. तरीही एका खासगी बँकेत शिपाई असलेला आकाश हा नेहमी तिच्यामागे असायचा. त्यांच्यात अनैतिक संबंध असावेत, असा गणेशला संशय होता. त्यामुळेच त्याने बहिणीशी संबंध न ठेवण्याबाबत आकाशला वारंवार इशारा दिला होता. मात्र, तरीही तो ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पडवळनगर येथे जय मल्हार इमारतीच्या बाजूला असलेल्या गणेशच्या बहिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी आला होता. याच रागातून गणेशने भाजी कापण्याच्या सुरीने तिच्या घरासमोरच त्याच्या पोटात चाकूचे दोन वार केले. त्याचा हा वार इतका जीवघेणा होता की, आकाश तिथेच रक्ताच्या थारोळयात कोसळला. तिथे जमा झालेल्या काही नागरिकांनी त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि दिनकर चंदनकर यांच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच तिथून पसार झालेल्या गणेशला अटक केली. श्रीनगर पोलीस ठाण्यात गणेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने खुनासाठी वापरलेल्या चाकूचाही शोध घेण्यात येत असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.