शेजाऱ्याच्या घरात डल्ला मारणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:50 AM2021-10-14T00:50:38+5:302021-10-14T00:55:45+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओंकार सरवनकर याला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे नळ दुरुस्तीची कामेच न मिळाल्यामुळे शेजाऱ्याच्या बंद घरातील घरगुती वापरातील सामान चोरणाऱ्या ओंकार सरवनकर (३३, रा. नौपाडा) याला नौपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. यातील सर्वच एक लाख १६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.
नौपाडा येथील ब्राह्मण सोसायटीतील एका घरात चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओंकार याला अटक केली. दरम्यान, रविवारी झालेल्या या चोरीत लोखंडी पलंग, तबला सेट आणि वॉटर कूलर व एक लाख १९ हजाराच्या ऐवजाची चोरी आरती मराठे यांच्या घरात झाली होती. यातील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डुप्लिकेट चावी बनवून चोरी
घराची डुप्लिकेट चावी बनवून ही चोरी केल्याची कबुली ओंकारने दिली. शेजारी आपले घर बंद करून अन्यत्र वास्तव्याला गेला होता. हीच संधी साधून ओंकार याने सामान हलविण्याचा बहाणा करीत शेजाऱ्याच्याच घरातील सामान चोरून ते एका टेम्पोतून नेरुळ येथे नेले. तिथे भाड्याने घेतलेल्या खोलीत हे सामान ठेवून ते विकण्याचा त्याचा बेत होता. त्यापूर्वीच नौपाडा पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली.