हाती काहीच न लागल्यामुळे इराणींची सुटका: पोलीस ठाण्यात मात्र हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:00 PM2017-12-22T19:00:09+5:302017-12-22T19:07:57+5:30
भिवंडीतील इराणी वस्तीत जाऊन पोलिसांनी तीन कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतू, ठोस काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्यांना सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे: गेल्या तीन दिवसांपासून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कथित सोनसाखळी तीन इराणी चोरटयांची अखेर सुटका करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात मात्र रोज हजेरी लावण्याची ताकीद देऊन त्यांना सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या तीन इराणींना वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, प्रशांत आवारे आदींच्या पथकाने मोठा थेट भिवंडींच्या शांतीनगर भागातील इराणी वस्तीतून मंगळवारी ताब्यात घेतले होते. दोन दिवस ‘कसून’ चौकशी करुनही त्यांनी तोंड उघडल नाही. शिवाय, त्यांच्याबद्दलची ठोस इतर काही माहिती हाती लागली नाही. बुधवारी इराणी वस्तीतील काही बुजूर्ग रहिवाशांनी हमी घेत पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या चोरटयांनी केलेल्या ‘कृत्या’ची वेगळी काही माहिती मिळाल्यास तीही तपास अधिका-यांना पुरविण्यात येईल, असा दावा या रहिवाशांनी केला. त्यामुळे तपासात सर्व प्रकारे सहकार्य करण्याच्या आणि गरज पडेल तेंव्हा पोलीस ठाण्यात येण्याच्या अटीवर या इराणींची तात्पूरती सुटका केल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली. पोलीस ठाण्यात मात्र हजेरी लावावी लागणार असल्यामुळे त्यांच्याकडून निश्चितच ठोस माहिती हाती येईल, असेही या अधिका-याने सांगितले.