बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:19 AM2021-07-12T00:19:38+5:302021-07-12T00:22:22+5:30
बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पांडे हा मुंबईतील अंधेरी येथील एका बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. आधी तो दिल्ली येथे कार्यरत होता. दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबईतील एका बँकेत साफसफाईचे काम करणाºया महिलेशी त्याची ओळख झाली होती. मध्यंतरी नोकरीवरुन तिला कमी करण्यात आले होते. नव्याने ती नोकरीच्या शोधात असतांनाच पुन्हा मुंबईत आलेल्या पांडे याने तिला बँकेत पुन्हा रुजू करण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार १९ जून २०२१ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जिंजर हॉटेलमध्ये तिला त्याने बोलविले. एका खासगी कंपनीच्या संचालकाशी बोलणी करण्याच्या बहाण्याने या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममध्ये घेऊन जाऊन दारुच्या नशेतच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. दरम्यान, नोकरी लावण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाºया पांडेविरुद्ध तिने अखेर ५ जुलै २०२१ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्चाचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही समांतर तपास सुरु होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर आणि पोलीस नाईक हेमंत महाले आदींच्या पथकाने ७ जुलै रोजी रात्री पांडे याला अटक केली.