अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:25 PM2023-11-30T13:25:32+5:302023-11-30T13:31:34+5:30
Dombivali Crime News: पूर्वेकडील खोणी पलावाच्या हद्दीत एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दोघांकडून दाेन लाख ३२ हजार रुपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.
डोंबिवली - पूर्वेकडील खोणी पलावाच्या हद्दीत एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दोघांकडून दाेन लाख ३२ हजार रुपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. आर्शद करार खान आणि शादाबुद्दीन मोईनुद्दीन सय्यद (दोघांचे वय २८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाइल फोन आणि दोन लाख २३ हजार ४०४ रुपयांची रक्कम असा एकूण पाच लाख ३० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दोघेजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार, अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम चोपडे, तारमळे यांचे पथक रवाना झाले. अमली पदार्थ विक्री करणारे पलावा सिटी गेट नंबर दाेन येथे आल्याची माहिती मिळताच दोघांना सापळा लावून अटक केली .
अटक केलेला आर्शद हा पलावा फेज टू मधील फाउंटना येथे राहतो तर शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे.
आर्शद याच्यावर मुंब्रा पोलिस ठाणे आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यात एमडी पावडर बाळगल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तो अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे.
एमडी पावडर पुरवठ्याचे राजस्थान कनेक्शन?
शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे. त्यामुळे तो आर्शदला एमडी पावडरचा माल आणून द्यायचा का? तो राजस्थानहून माल आणायचा का, याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे.