रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:46 AM2019-05-30T05:46:50+5:302019-05-30T05:47:01+5:30
उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
डोंबिवली : उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मोहम्मद चाँद लुले खान (२३), अफजल कासीम खान (२२), दिन मोहम्मद अयुब खान (३५), फरमान रज्जब खान (२४) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौघेही मुंबईत नागपाडा येथे वास्तव्याला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यासंदर्भात निलेश विजेंद्र प्रसाद (२३, रा. उत्तर प्रदेश) यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश २३ मे रोजी त्यांचे वडील, दोन मित्रांसमवेत गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वेस्थानकात आले होते.
तिकीट काढण्यासाठी उभे असताना दोन अनोळखी इसमांनी कुर्ला येथे गेल्यावर जागा मिळेल, असे सांगून लोकलने रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांना कुर्ला येथे घेऊन गेले. कुर्ला स्थानकातून कुर्ला टर्मिनस येथे जाण्यासाठी अंधारातून रेल्वेरुळांमधून मार्ग काढताना त्या अनोळखी इसमांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना फोनवर संपर्क करून बोलावून घेतले. त्यानंतर त्या चौघांनी निलेशसह चौघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच धारदार चाकूने वार करत दुखापत केली.
त्यानंतर, त्यांच्याजवळील तीन मोबाइल, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. पोलिसांनी कल्याण रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून संशयितांची माहिती घेण्यात आली. पोलिसांच्या खबऱ्यांकडून समजले की, २०१८ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले हे चौघे आरोपी सध्या जामिनावर सुटले असून नागपाडा, मुंबई येथील रहिवासी आहेत.
कुर्ला आणि कल्याण स्थानकांत पोलिसांनी सापळा रचला असता २६ मे रोजी कल्याण रेल्वेस्थानकात चोरीच्या उद्देशाने सावज हेरत असताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी अशाप्रकारे आणखी चार गुन्हे केले असल्याचे सांगितले.
>बुधवारपर्यंत कोठडी
सीसीटीव्हीत मिळालेले फुटेज आणि प्रत्यक्ष आरोपी हेच असल्याची खातरजमा केल्यावर त्या चौघांना मंगळवारी अटक केली. बुधवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून तीन मोबाइल, १६ हजार ५०० रुपये रोख रक्कम, दोन चाकू असा एकूण २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.