तालासुराविना गणरायाचे आगमन अन् विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:29+5:302021-08-20T04:46:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ढोल-ताशांच्या सरावाचा आवाज ऐकू यायला लागला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गेल्या वर्षी मात्र ...

Arrival and immersion of Ganarayana without Talasura | तालासुराविना गणरायाचे आगमन अन् विसर्जन

तालासुराविना गणरायाचे आगमन अन् विसर्जन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ढोल-ताशांच्या सरावाचा आवाज ऐकू यायला लागला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गेल्या वर्षी मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावात साधेपणाने साजरा झालेल्या गणेशोत्सवात मिरवणूक काढायला मनाई केली असताना ढोल-ताशा वाजवायलाही बंदी घातली होती. यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असून, त्यात डेल्टा प्लसचे रुग्ण इतरत्र आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, अशा सूचना करून राज्य सरकारने मिरवणुकांनाही बंदी घातली आहे. परिणामी गणपती विसर्जन सोहळ्याच्या वेळी दिसणाऱ्या भव्य मिरवणुका ढोल-ताशा पथक, लेझिम व त्यांना मिळणारी साथ यंदाही पाहायला मिळणार नाही.

दरवर्षी गणेशोत्सवात ढोलपथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. पथके नावीन्य घेऊन आपली कला सादर करतात. तासांवर पथकांना ढोल वाजविण्याची बिदागी मिळत असते. यात लाखो रुपयांची कमाई होते. गणेशोत्सवापूर्वी सुमारे दोन महिने ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. हा सरावाचा गजर गणेशोत्सव जवळ आल्याची चाहूल देत असतो. अनेक तरुण-तरुणी, महिला, मुले कमरेला ढोल-ताशा बांधून पथकात सरावासाठी सहभागी होतात. परंतु, हे चित्र मागील वर्षाप्रमाणे यंदाही दिसून आले नाही. कोरोनामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही मिरवणूक काढण्यास मनाई असल्याने ढोलपथकांची आर्थिक घडी विस्कटणार आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये निर्बंध खूपच कडक होते. सध्या ते शिथिल केले आहेत. त्यामुळे मोजक्या वादकांना परवानगी द्यावी, अशी मागणी ढोल-ताशा पथकांनी केली आहे.

--------------------------------------

दोन वर्षे वाद्ये खितपत पडली आहेत

गणेशोत्सवाची चाहूल लागताच वादकांची लगबग सुरू होते; परंतु दोन वर्षांपासून मिरवणुका बंद आहेत. काही ठिकाणी त्या निघत असल्या तरी ढोल-ताशा पथकांना परवानगी मिळत नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आमच्यावर निर्बंध कायम आहेत. सरावालाही परवानगी मिळत नाही. दोन वर्षांपासून वाद्ये खितपत पडून आहेत. राज्य सरकारची नियमावली पाहता यंदाही ढोल-ताशा वाजवायला पथकांना परवानगी मिळेल, असे वाटत नाही. यात वादकांच्या उत्साहावर विरजण पडणार असले तरी आमच्याकडून सामाजिक उपक्रम गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राबविणार आहोत. - अनिकेत ढवळे, संस्थापक-अध्यक्ष, औदुंबर ढोल-ताशा ध्वजपथक, कल्याण पूर्व

----------------------------------------

नियम सर्वांना सारखे हवेत

गणेशोत्सवात मिरवणुकांना बंदी घातलेली आहे. त्यामुळे आपसुकच ढोल-ताशांनाही परवानगी मिळणार नाही. परंतु, कोरोनाचे नियम करताना ते सर्वांना बंधनकारक असले पाहिजेत. परंतु, राजकीय पक्ष, तो कोणताही असो; त्यांच्याकडून निदर्शने, रॅली काढल्या जातात. यात गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. मग, त्यांना परवानगी कशी मिळते? कोरोनात जीव वाचवायचे असतील तर नियम सर्वांना सारखे हवेत. आजघडीला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत, त्याप्रमाणे ढोल-ताशा पथकांनाही नियम घालून परवानगी मिळावी. जेणेकरून जी पथके बिदागी घेतात, त्यात बरेचसे वादक हे गरीब कुटुंबातील असतात; त्यामुळे संबंधित पथकांना दिलासा मिळेल.

- अभिषेक दंडगे, वादक, वक्रतुंड ढोल-ताशा पथक, डोंबिवली

----------------------------------------

Web Title: Arrival and immersion of Ganarayana without Talasura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.