डहाणू समुद्रकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:37 AM2020-12-14T00:37:34+5:302020-12-14T00:37:37+5:30

जिल्ह्यातील खाडी आणि समुद्रकिनारी खडकाळ व दलदलीचे भाग, कांदळवने या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आढळून आला आहे.

Arrival of guest birds at Dahanu beach | डहाणू समुद्रकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन

डहाणू समुद्रकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन

Next

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : यंदाही डहाणू समुद्रकिनाऱ्यालगत नारंगी छातीची हरोळी आणि अन्य दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. पालघर जिल्ह्याला पक्ष्यांचा समृद्ध वारसा लाभल्याने ऋतुनुसार नानाविध जातींचे देशी-परदेशी स्थलांतरित पक्षी दृष्टीस पडत आहेत. हिवाळ्यात अशा दुर्मीळ पक्ष्यांच्या आगमनाने पक्षी अभ्यासक आणि पक्षी निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील खाडी आणि समुद्रकिनारी खडकाळ व दलदलीचे भाग, कांदळवने या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आढळून आला आहे.
हिवाळ्याच्या हंगामाला प्रारंभ झाला असून, समुद्रकिनारी सिगलांचे सहज दर्शन घडत असताना, पक्षी अभ्यासकांना नारंगी छातीची हरोळी, नीलिमा, पिवळ्या पोटाचा वटवट्या, काळ्या डोक्याचा खंड्या या पक्ष्यांनी दर्शन दिल्याने पक्षीनिरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. गतवर्षी जिल्ह्यात दुर्मीळ असणाऱ्या नारंगी छातीची हरोळी या पक्ष्याचे दर्शन डहाणूतील किनारी भागात झाले होते. यावेळी घरट्या शेजारी पक्ष्यांची दोन पिल्लेही दिसली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी हा पक्षी घरटे बांधतो. राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात त्याचे वास्तव्य आहे. डहाणूतही वाढवण किनाऱ्यावर त्यांनी प्रजनन केल्याचे चिंचणीतील पक्षीनिरीक्षक भावेश बाबरे यांनी सांगितले.
दरम्यान, उलट चोचीचा तुतारी, रंगीत तुतारी, हिरवा तुतारी, राखी चिखल्या, सोन चिखल्या, चातक, नवरंग, काळा बगळा, पांढरा अवाक, निळपंख, पिवळ्या पायाची हरोळी (महाराष्ट्राचा राज्य पक्षी) अशा नाना जातींच्या स्थलांतरित पक्ष्यांचे येथे दर्शन ऋतुमानानुसार घडते. हे पक्षी एकेकटे तर काही वेळा थव्यांनी दर्शन देतात. जिल्ह्यात पक्षी अभ्यासकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली, तरी पक्षीनिरीक्षकांची संख्या वाढते आहे. कॅमेरा, मोबाइल आणि छोटी डायरी घेऊन हे पक्षीनिरीक्षक खाडी व समुद्रकिनारी भागात पायपीट करतात. यावेळी पक्ष्यांच्या हालचाली आणि आवाज ऐकल्यावर मिळणारी अनुभूती सुखद असल्याच्या प्रतिक्रिया शैलेश बाबरे, आशीष बाबरे, प्रवीण बाबरे या पक्षीनिरीक्षकांनी नोंदविली आहे.

गतवर्षी नारंगी छातीच्या हरोळी पक्ष्यांनी वाढवण परिसरात येऊन प्रजनन केले होते. दुर्मीळ पक्ष्यांना डहाणू तालुका पसंत असल्याचे आढळून येते. पर्यावरणाबाबत हा समृद्ध वारसा आहे.
- भावेश बाबरे, पक्षीनिरीक्षक

Web Title: Arrival of guest birds at Dahanu beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.