मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

By धीरज परब | Published: November 22, 2023 01:02 PM2023-11-22T13:02:59+5:302023-11-22T13:08:35+5:30

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

arrival of manoj jarange patil increased the enthusiasm of the maratha community in mira bhayandar | मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मीरारोड मधील आगमन व जाहीर सभेमुळे मीरा भाईंदर मधील मराठा समाजात उत्साह वाढून आरक्षणासाठीच्या लढ्याला बळ मिळाले आहे . मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले. 

काशीमीरा येथील अखंड हरिनाम सप्ताहचा मंगळवारी बीड च्या श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या कीर्तनाने समारोप झाला . महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि मीरा भाईंदर मधील मराठा समाज बांधवाना भेटण्यासाठी जरांगे पाटील दुपारी तिच्या सुमारास आले . काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले . मराठा समाजाने त्यांचे उत्साहात स्वागत केले . त्यांच्या आगमना वेळी दुचाकी रॅली काढण्यात आली . सुमारे ५०० किलो फुलं त्यांच्या स्वागतासाठी आणली होती . काशीमीरा , जरीमरी तलाव येथील हरिनाम सप्ताह व्यासपीठावर मराठा समाजाच्या वतीने अरुण कदम , सुरेश दळवी , रमेश मोरे , जयराम मेसे , मनोज राणे , सचिन पोपळे, सुभाष काशीद, प्रकाश नागणे  आदींनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . 

आपल्याला दुसऱ्याचे नको आहे  तर आमच्या हक्काचे आहे ते हवे . आरक्षण दिल्या शिवाय सरकारला सुट्टी नाही .  आता पर्यंत मराठा समाजाच्या ३२ लाख नोंदी सापडल्या असून पावणे दोन कोटी लोकांच्या घरात आरक्षणाची भाकरी मिळणार आहे . मराठा आरक्षण ७० वर्षात मिळत नव्हते ते आता निर्णय प्रक्रियेत आले आहे . ८५ टक्के लढाई जिंकलेली आहे व १५ टक्के फक्त बाकी आहे ती सुद्धा लवकरच जिंकू. 

काही जणांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो आपण होऊ द्यायचा नाही. विजयाचा क्षण जवळ आला आहे . पण सावध रहा आणि एकजूट रहा . आपली एकजूट तुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले .  मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तो वाजलाच म्हणून समजा असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला .  हे व्यासपीठ हिंदु धर्माचे , वारकरी सांप्रदायाचे असल्याने हे ते व्यासपीठ नाही. अन्यथा बऱ्याच जणांना सोडले नसते असा टोला त्यांनी  विरोधकांना लगावला .  

Web Title: arrival of manoj jarange patil increased the enthusiasm of the maratha community in mira bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.