प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके' संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 04:39 PM2019-05-14T16:39:41+5:302019-05-14T16:44:18+5:30
प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके' संपन्न झाला.
ठाणे : साहित्यातून उलगडणाऱ्या मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा “ऐसी अक्षरे रसिके..” हा बहारदार कार्यक्रम ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे आणि ‘पाच- तीन- दोन मनोरंजन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला.
निलेश पवार, ज्ञानेश्वर नाईक, शिवराज धनावडे व तपस्या नेवे या तरुणांनी आपल्या सादरीकरणातून ग.दि.माडगुळकर, पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, रणजित देसाई, व्यंकटेश माडगुळकर, अरविंद जगताप आदि प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतींचे दर्शन घडवले. कथा, कविता, संवाद, विनोद, कीर्तन आदि सर्व अंगांना स्पर्श करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. व्यंकटेश माडगुळकर यांची वाटसरू ही कथा आणि रणजित देसाई यांची ताजमहाल या कथा रसिकांना खूप भावल्या. “सावरकरांनी मराठीत वेशभूषा, मध्यंतर, महापालिका, नभोवाणी, त्वरित, अहवाल असे अनेक नवीन शब्द देवून मराठी भाषा अधिक समृद्ध केली आहे.” असे ज्ञानेश्वर नाईक म्हणाले.“मराठी साहित्यातील माणिक मोती जपण्याचा व नव्या पिढी समोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न म्हणजे खारीचा वाट आहे.” असे उद्गार सादरकर्ती तपस्या नेवे यांनी काढले. “लोकांना साहित्याकडे वळवण्यासाठी व वाचन संस्कृती वाढवण्यासाठी दर महिन्याला एक साहित्यिक कार्यक्रम करण्याचा आमचा संकल्प आहे. त्या अंतर्गत आजचा कार्यक्रम आहे” असे मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यकारी सदस्य दुर्गेश आकेरकर यांनी केले तर आभार मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यकारी सदस्य संजीव फडके यांनी मानले.दोन तास मंत्रमुग्ध होऊन रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.