कलागोष्ट : भूल देणारी कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:01 AM2018-10-02T05:01:20+5:302018-10-02T05:01:36+5:30
विजयराज बोधनकर
आज माणसाला नवा विचार ऐकायला आणि वाचायलासुद्धा वेळ नाही. मग याला नवं युग म्हणायचं तरी कसं? स्वत:चा विचार करायलासुद्धा वेळ नाही म्हटल्यावर आजचा माणूस करतो तरी काय? तर आजचा माणूस उत्पादने घेत सुटलाय आणि नवं जग त्या उत्पादनांच्या गराड्यात, वस्तूंच्या गराड्यात अडकत चाललं आहे. कळपाचं धैर्य नेहमीच हत्तीच्या ताकतीच असतं. हे आपण टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघतो. समविचारी फक्त हजार माणसं एकत्रित आलेत आणि त्यांनी ठरवलं की, जगाला फसवायचं तर ते सहज जगाला फसवू शकतात. त्यांनी ठरवलं की, जगाला हसवायचं तर ते हसवू शकतातं. एकत्रितपणाची ही ताकद आहे. त्याचा रेझोनन्स ताकतीचा असतो. एकत्रित विचारांनी एकत्र येणं ही एक कला आहे. मोठमोठ्या उत्पादनशील कंपन्या एकत्रित असल्यामुळेच जग त्यांच्या मुठीत असतं आणि मग ते प्रत्येक एकट्या माणसांवर राज्य करीत सुटतात.
राजकीय पक्षसुद्धा एकत्रित विचारांच्या स्पंदनांनी चार्ज होतात आणि जग मुठीत घेतात, राज्य करतात. एकत्र येण्यासाठी एक उद्देश हवा असतो. उद्देशात एक स्वार्थही लपलेला असतो. स्वार्थात दिवास्वप्न लपलेले असतात, स्वप्नपूर्ती की प्रत्येकाची सुह्यइच्छा असते. स्वार्थ हे असे सॉफ्टवेअर आहे जे हार्डवेअरला हॅण्डल करते, पण ते सॉफ्टवेअर कधीच दिसत नाही. असंच एक अजून सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे जाहिरात कंपन्या. कुठल्याही उत्पादनाला चकचकीत कपडे घालून, घेणाऱ्याला भूल देणारी ही कंपनी असते. चिंध्या पांघरून सोनं विकत बसलो कुणी घेईना, मात्र सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो तर चिंध्याही लोकांनी विकत घेतल्या, ही रचना गायधनी नावाच्या कवीने जगापुढे मांडली. याच व्याख्येत जाहिरात कंपनी अगदी चपखल बसते. जाहिरात क्षेत्र हे भूलभुलैयाचं क्षेत्र आहे. आपण आज कुठलंही प्रॉडक्ट जाहिरात बघितल्याशिवाय घेत नाही. जाहिरात ही पासष्टावी कला मानली गेली. तिथे चतुर व अत्यंत जागृत माणसे असतात. जगात काय चालू आहे, या वर्तमानाची त्यांना खडान्खडा माहिती असते. समाजमनाचं मानसशास्त्र याचे ते अभ्यासक असतात. भावनेच्या आहारी जाणाºया चंचल मनाला ते नेहमी जाळ्यात ओढतात आणि ते जाळं असतं कलेचं. टर्मरिक क्रीम लावून जसं कुणी आजपर्यंत उजळलं नाही, गोरं झालं नाही. तरी जग आजही त्या क्रीम वापरते आहे. आज रोज नवे कलात्मक प्रॉडक्ट बाजारात येतात आणि त्याची विक्री जाहिरातीच्या माध्यमातून जोरात होते. कारणं ते प्रॉडक्ट खरंच त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणेच आहे का, याची खात्री करून घ्यायलाच आपल्याकडे वेळ नाही आणि हाच त्यांच्यासाठी मुख्य मुद्दा आहे. समाजाचं मानसशास्त्र अभ्यासून त्याला सोन्याची झूल घालून तो अभ्यास जगाला मुठीत करून घेण्यासाठी फायद्याचा ठरतो आणि नेमकी ही पासष्टावी कला त्यावर जगते आहे. आजची ती सर्वात प्रभावी कला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.