श्री विसर्जनासाठी कृत्रिम तलाव?
By admin | Published: July 13, 2016 01:41 AM2016-07-13T01:41:35+5:302016-07-13T01:41:35+5:30
चार फूटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींंचे विसर्जन समुद्रात करून त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा पालिकेचा विचार आहे.
शशी करपे, वसई
चार फूटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींंचे विसर्जन समुद्रात करून त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा पालिकेचा विचार आहे.
नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी यंदा गणेशमूर्तींचे तलावात विसर्जन करण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करुन गणेश भक्तांना दिलासा देण्याचा पालिकेकडून प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाने या संदर्भात अध्यादेश जारी केल्यानंतर मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम तलावासाठी किती खर्च येऊ शकतो. तसेच गणेश मूर्तींचे विजर्सन समुद्रात करायचे कि कृत्रिम तलावांची निर्मिती करायची यावर चर्चा सुरु असून या आठवड्यात त्यावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती पालिका आयुक्त सतिश लोखंडे यांनी दिली.
पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू माती, इकोफ्रेंडली गणेश मूर्त्यांचा कल वाढत चालला असला तरी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणपती मूर्त्याना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडूमातीच्या तसेच इाकाफ्रेंडली मूर्त्या तलावांमध्ये नैसर्गिकरित्या विरघळत असल्या तरी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्या मात्र पर्यावरणासाठी हानिकरक ठरत असतात. तलावात गणेश मूर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर प्लास्टर आॅफ पॅरीस नैसर्गिकरित्या नष्ट होत नसल्याने तलावातील नैसर्गिक झऱ्यांना त्यामुळे हानी पोहोचते. त्याच बरोबर विसर्जनाच्यावेळी गणेश मुर्त्यांबरोबर निर्माल्य देखील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जित केले जात असल्याने तलावातील पाणी दूषित होऊन मस्त्यजीवांना धोका पोहचण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा तलावांमध्ये गणेश मूर्त्यांचे विसर्जन न करता गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी असा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने घरगुती गणपतींसाठी कृत्रिम तलाव निर्मिती करण्याबरोबरच चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याच्या दृष्टीनेही पालिका विचाराधीन असल्याचे समजते. नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला जात असला तरी गणेश भक्त व मंडळे त्याला किती सकारात्मक प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे. वसई तालुक्यात सार्वजनिक गणपतींची मोठ्या संख्येने स्थापना केली जाते. मुंबई प्रमाणेच आता वसई तालुक्यातही दहा-बारा फूट उंचीच्या गणपती मूर्त्यांची स्थापना केली जाते. आतापर्यंत वसई तालुक्यातील काही ठराविक मंडळे मोठ्या गणेश मूर्त्यांचे समुद्रात विसर्जन करीत असल्या तरी बहुतांश मोठ्या मूर्त्यांचे तलावातच विसर्जन केले जाते.