कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:23 AM2019-08-08T00:23:02+5:302019-08-08T00:23:05+5:30

‘मुंबई द सिटी युनायटेड’ कार्यक्रम : उलगडले शहराचे अंतरंग

Artists created Mumbai Darshan from literature | कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन

कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन

Next

ठाणे : मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मुंबईकरांचे जीवनमान उलगडण्यात आले. अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडवले. निमित्त होते ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित केलेल्या लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे.

हा सोहळा बुधवारी ‘मुंबई द सिटी युनायटेड’ या कार्यक्रमाने झाला. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती असे सगळी मुंबई व्यापणारे साहित्य ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. अक्षय आणि धनश्री यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांबरोबर, प्राध्यापकांचीही मने जिंकली. विदेशी माणूस पहिल्यांदा मुंबईत येतो, तेव्हा त्याला काय वाटते, हा उतारा धनश्रीने वाचून दाखवला. त्यानंतर मुंबईची खाद्यसंस्कृती, ठाणे ते बोरीबंदर धावलेली लोकल, बाल्या डान्स, डबेवाल्यांची कहाणी, मुंबईतील उद्योगधंदे, मुंबईची गोड आणि काळी बाजू विविध प्रसंगांतून तर कधी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सादर केली. एकेकाळी मुंबईला स्वत:ची लय, गती होती. आज मुंबईचे डिझास्टर झाले आहे, असे सांगून अक्षयने अरुण कोल्हटकरांची ‘चरित्र’ ही कविता सादर केली. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईची लावणी सादर करताना विद्यार्थ्यांनीही ताल धरला. नामदेव ढसाळ यांची कविता अक्षयने सादर केली. धनश्रीने सादर केलेल्या तन्वीर सिद्दीकी यांची ‘जमलंच तर...’ या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिलेला ब्लॅक फ्रायडे टू ब्लॅक वेद्नस्डे हा लेख वाचून दाखवण्यात आला. ‘घालीन मी साऱ्या ब्रह्मांडास पाठी’ ही नारायण सुर्वेंची कविता सादर झाल्यावर ‘मिसळ झाली मुंबई’ या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी लिटररी असोसिएशनच्या माधुरी पाथरकर, इंग्रजी विभागाच्या प्रमुख ऋणा सजीव, प्रा.डॉ. धनंजय मुळस्कर, प्रा. जितेंद्र हळदणकर, प्रा. रूपाली मुळ्ये, बाबासाहेब कांबळे, तुषार चव्हाण, संतोष पाठारे आदी उपस्थित होते.

Web Title: Artists created Mumbai Darshan from literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.