नाट्यप्रयोग रद्द करण्याचा आग्रह कलावंतांना नाही
By admin | Published: February 4, 2016 02:32 AM2016-02-04T02:32:14+5:302016-02-04T02:32:14+5:30
संमेलनादरम्यान कलावंतांनी इतर ठिकाणी होणारे नाटकांचे प्रयोग रद्द करावे, असा आग्रह मी करणार नाही. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे, एवढेच आम्ही सांगू शकतो
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
संमेलनादरम्यान कलावंतांनी इतर ठिकाणी होणारे नाटकांचे प्रयोग रद्द करावे, असा आग्रह मी करणार नाही. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे, एवढेच आम्ही सांगू शकतो, असे स्पष्ट मत अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
संमेलनाला नाट्य कलावंत दांडी मारून त्यांचे इतरत्र प्रयोग करत असतात. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा संमेलनातील नाट्यरसिकांमध्ये असते, यावर मोहन जोशी यांना विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणाऱ्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलन स्थळांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ते ठाण्यात आले होते.
नाट्यसंमेलनाच्या काळात कोणी आपले कार्यक्रम रद्द करावे, या वृत्तीचा मी नाही. त्यामुळे मला कधीही असे वाटत नाही की, आमचा कार्यक्रम आहे म्हणून इतरांनी त्यांचे कार्यक्रम रद्द करावेत. प्रत्येकाला मत आहे.
संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजकांसोबत एक बैठकही घेण्यात आली. त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाट्यरंगकर्मींनी संमेलनाला यावे, यासाठी ३०० ते ४०० जणांना आम्ही मेसेज केले आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींना पत्रदेखील पाठविली आहेत. कार्यक्रमांची अंतिम आखणी झाली, असे म्हणायला हरकत नाही. शनिवारी कार्यक्रमांचे स्वरूप जाहीर होईल, असे जोशी यांनी सांगितले.
नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खा. राजन विचारे म्हणाले, सर्व ठाणेकर उत्सुकतेने कामाला लागले आहेत. तारीख निश्चित झाल्यापासून दररोज गडकरी रंगायतनमध्ये बैठक घेत असतो. शहरातील सहा ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मुख्य रंगमंच असणार आहे. संमेलनात नवोदित कलाकारांना वाव दिला जाणार असून त्यांना आपले कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आढावा बैठकीत कार्यक्रमांचे स्वरूप ठरविण्यात आले. या वेळी मोहन जोशी, लता नार्वेकर, खा. राजन विचारे, महापौर संजय मोरे, नरेंद्र बेडेकर, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते. बैठकीनंतर स्टेडियमची व मासुंदा तलावाची पाहणी करण्यात आली.