विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीबद्दल अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली ठाणे पोलिसांची दखल
By जितेंद्र कालेकर | Published: April 20, 2020 01:36 AM2020-04-20T01:36:26+5:302020-04-20T01:42:07+5:30
ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात वास्तव्याला असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या १२ तरुण तरुणींना ठाणे पोलिसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. अरुणाचलच्या सीएमओ कार्यालयाच्या ट्वीटर हँडरद्वारे त्यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अरुणाचल प्रदेश येथील काही विद्यार्थी आणि विद्यार्थीनी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले असून त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती ठाणेपोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या पथकाने त्यांना शनिवारी ही मदत पुरवली. पोलिसांच्या याच कामगिरीची दखल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी घेतली असून ट्वीटरद्वारे जाहीर कौतुकही केल्याची माहिती त्यांनी सीएमओ महाराष्ट्र आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयालाही कळविली आहे.
अरुणाचल प्रदेशमधील रहिवाशांच्या चेहऱ्यावर चीनच्या नागरिकांचे साधर्म्य आहे. कोरोनाची लागण होण्यासही चीनपासूनच सुरुवात झाली. चीनी समजून कोणी हल्ला तर करणार नाही ना? शिवाय, ठाणे शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या ब्रम्हांड भागात शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने अडकलेल्या अरुणाचल प्रदेशच्या सहा तरुण आणि सहा तरुणींपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. ही माहिती त्यांनी थेट अरुणचल प्रदेश सरकारला कळविली. याची दखल अरुणाचलच्या सीएमओ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे एकेकाळी वैयक्तिक सचिव (पीएस) असलेले अरुणाचलचे विद्यमान सह सचिव प्रशांत लोखंडे यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे शासनाच्या मार्फतीने या १२ जणांना काही मदत करता येईल का? अशी विचारणा केली. तेंव्हा पाटील यांनी या सर्वांचे पत्ते घेऊन वैयक्तिक पदरमोड करीत त्यांना अत्यावश्यक सामान १८ एप्रिल रोजी घरपोच दिले. ठाणे पोलिसांनी कोरोनासारख्या अडचणीच्या काळात केलेल्या तत्पर मदतीबद्दल हे सर्व विद्यार्थी भारावून गेले. ही माहिती मिळताच अरुणाचल प्रदेशच्या सीएमओ कार्यालयाचे लोखंडे यांनीही पाटील आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.