'क'मध्ये उलगडला जेष्ठ कवयित्री अरुणा ढेरेंचा काव्यप्रवास, त्यांच्या अनरेड, अनहर्ड कवितांची रंगली मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:47 PM2018-06-26T14:47:33+5:302018-06-26T14:49:10+5:30
मराठी कवितेला आणि साहित्याला अजरामर कविता देणाऱ्या अरुणा ढे-यांच्या आतापर्यंत अनरेड आणि अनहर्ड कवितांची मैफिल रंगली ती 'क' ह्या कार्यक्रमातून. हा 'क' ह्या कार्यक्रमाचा चाैथा प्रयोग होता. ह्या आधी या कार्यक्रमात अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर ह्यांनी हजेरी लावली होती.
ठाणे : मराठी साहित्याला अजरामर कविता देणाऱ्या अरुणा ढे-यांच्या आतापर्यंत अनरेड, अनहर्ड कवितांची मैफिल रविवारी ठाण्यात सहयोग मंदिर येथे पार पडली. कोलाज निर्मित 'क' या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरूणा ढेरेंचा काव्यप्रवास पहिल्यांदाच त्यांच्याच उपस्थितीत ठाणेकर रसिकांसमोर आला. नव्या पिढीतील कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, पंकज दळवी ह्या त्रयींनी सुरुवातीला अरुणा ढेरेंच्या काही कवितांचे वाचन केले व नंतर त्यांच्या साहित्या संदर्भातील विविधांगी प्रश्न विचारले.
संकेत म्हात्रेंनी अरुणा ढेरेंच्या प्रारंभ, मन वेडे खुळे ह्या कवितांचे वाचन केले तर पंकज दळवींनी खेळ, तुझ्या डोळ्यांतली गाणी, प्रेमासाठी या कविता सादर करून दाद मिळवली. गीतेश शिंदे यांनी अरुणा ताईंच्या प्राणांमधूनी पूल करावा, एक इवलासा शब्द या कवितांसोबतच गाऊन सादर केलेली आषाढाचे कृष्ण मेघ या कवितेला रसिकांनी ठेका धरला. चांगली कविता अंतर्मुख करणारी की टाळ्यांची दाद मिळवणारी ह्या पंकजने विचारलेल्या प्रश्नावर, 'चांगली कविता म्हणजे दोन शब्दांमधली जागा. कोणताही कवी त्याच्या मनातील अमुर्त भावांना कवितेतून उतरवू पाहतो. जो जास्तीत जास्त त्यात यशस्वी होतो त्याला कविता गवसते' असे अरुणा ताईंनी म्हंटले. तर पुराणातील, लोकपंरंपरेतील स्त्रीयांची सांगड एकविसाव्या शतकातील स्त्रीयांशी करणं तितकच साजेसं आहे का या संकेतने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून अरुणा ताईंनी त्यामागची भूमिका स्पष्ट करत जनी, रंगमहाली विठूच्या आणि राधेवरील कविता सादर केल्या. तुमची कविता बाईपणाबद्दल जरी असली तरी तिने फेमिनीझमचे उसने अवसान घेतलेले नाही आणि त्यात पुरुषांबद्दलची आक्रस्ताळी चीडही नाही या गीतेशने विचारलेल्या प्रश्नावर अरुणा ढेरे म्हणाल्या की 'आजवर पुरुषाकडे फक्त एकाच मानसिकतेतून पाहण्यात आले असून वेग वेगळ्या टप्प्यावर भेटणारा पुरुष हा बाईच्या घडणीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. यालाच जोडून त्यांनी सादर केलेल्या 'पुरूष असाही असतो राधे' या कृष्णावरील व अनयावरील दोन कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमातून त्यांनी लोकसाहित्याचे संदर्भ देत या विषयाचे कंगोरे तर उलगडलेच पण विविध आकृतीबंधातील कविताही सादर केल्या. 'क' सारख्या प्रयोगशील काव्य चळवळीतून एका कवीला सलग ऐकता येतं, रसिकांना त्याच्याशी संवाद साधता येतो. जे पंचवीस तीस कवींच्या मंचीय गर्दितून साधता येत नाही तो काव्यानुभव अशावेळी टिपता येतो हे अरुणा ढेरेंनी नमुद करत कोलाजच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. ह्या वेळी 'क'मध्ये विशेष प्रयोग म्हणून अरुणा ताईंना सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्राचेही वाचन झाले. तसेच कुसुमाग्रज, सुरेश भट, शांताबाई शेळके, इंदिरा संत यांच्या अरुणा ताईंनी सांगितलेल्या पत्ररुपी आठवणीत श्रोते रममाण झाले. ह्या प्रसंगी जेष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांच्या हस्ते कोलाजकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भर पावसातही ठाणेकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती. लवकरच 'क'चा अरूणा ढेरेंवरचा विशेष प्रयोग पुण्यात करणार असल्याचे कोलाज तर्फे पंकज दळवी यांनी सांगितले. 'प्रत्येक कवितेत अनेक दारं असतात जी तुम्हाला शोधायची आहेत' या कवितेने 'क'चा समारोप झाला.