अरविंद पेंडसे उद्यानालाही आली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:39 AM2019-06-12T00:39:47+5:302019-06-12T00:40:03+5:30

महापौरांचा प्रभाग : रहिवाशांनीच वाचला दुरवस्थेचा पाढा, देखभालीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Arvind Pendse also came to the park | अरविंद पेंडसे उद्यानालाही आली अवकळा

अरविंद पेंडसे उद्यानालाही आली अवकळा

googlenewsNext

मीरा रोड : महापौरांच्या प्रभागातील रामभाऊ म्हाळगी उद्यानाची दुरवस्था झाल्याचे समोर आले असतानाच, आता महापौरांच्या कार्यालयामागील अरविंद पेंडसे उद्यानातील दुरवस्थेवरुन लोकांमध्ये नाराजी आहे. सदर उद्यानसुध्दा महापौरांच्याच प्रभागतले आहे, हे विशेष.

मीरा भार्इंदर महापालिकेच्या रामदेव पार्क येथील रामभाऊ म्हाळगी उद्यानाची गेल्या ८ महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. उद्यानातील गवत व रोपं वाळली आहेत, पाण्याचा कुलर नादुरुस्त झाला आहे. चालण्यासाठी टाकलेल्या लाद्या उखडलेल्या आहेत, आतील तलावात मासे मरु लागले आहेत, आदी प्रकारच्या तक्रारी करुनदेखील स्थानिक नगरसेवक व पालिकेकडून याची दखलच घेतली गेली नाही. याविरोधात काहींनी तक्रारी केल्या असून परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.
म्हाळगी उद्यानाच्या दुरवस्थेवरुन पालिका आणि स्थानिक नगरसेवकांवर टिकेची झोड उठत असताना याच प्रभागातील अरविंद पेंडसे उद्यानाचीदेखील वाताहत झाल्याचे आढळून आले आहे. स्थानिक रहिवाशांनीच येथील गैरसोयी आणि दुरवस्थेचा पाढा मांडला आहे. पेंडसे उद्यान हे महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यालयामागे, तर आमदार नरेंद्र मेहतांच्या कार्यालयासमोर आहे. पालिका निवडणुकीआधी सदर उद्यानाचा मोठा गाजावाजा करत उद्घाटन सोहळा करण्यात आला होता. पण निवडणुकीनंतर मात्र म्हाळगी उद्यानाप्रमाणेच पेंडसे उदद्यानाच्या देखभाल - दुरुस्तीकडे डोळेझाक करण्यात आली. पेंडसे उद्यानाच्या विकासासाठी तसेच पालिकेने आत वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृती, लहान मुलांची खेळणी व खुली व्यायामशाळा आदींवर काही कोटींचा खर्च केला. आता मात्र गवत व रोपं सुकली आहेत. पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टीक आदी कचरा साचून आहे. तोडलेल्या फांद्यांचा ढिग तसाच टाकून ठेवण्यात आला आहे. बसण्याच्या बाकांवरसुध्दा कापलेल्या फांद्या आदी टाकून ठेवल्याने बसण्याची गैरसोय झाली आहे. लहान मुलांच्या खेळणीच्या ठिकाणी त्यांना पडून लागू नये म्हणून मऊ स्पंज बसवण्यात आला होता. तो पण फाटून निघालेला आहे. त्यामुळे मुलं अडकून पडण्याची, तसेच खेळताना लागण्याची भिती पालकांना असते.
पाण्यासाठी लावलेला कुलर बंद असल्याने पाणी पिण्याचे झाल्यास बाहेरुन बाटली विकत आणावी लागते. उद्यानाच्या मध्यभागी बनवलेले पाण्याचे कारंजे सुरुच नसते. लहान मुलांसाठी बसवलेली खेळणी तुटलेली आहेत. ओला कचऱ्यापासून खत बनवण्याची जागा पालिकेने ठेवली असली, तरी त्यावर लावलेल्या जाळीवरच ओला कचरा टाकून ठेवण्यात आलाय. प्रभागात महापौरांसह भाजपचे गटनेते हसमूख गहलोत, अरविंद शेट्टी आणि डॉ. प्रिती पाटील असे चार नगरसेवक असूनही प्रभागातील उद्यानांच्या दुरवस्थेवरुन नागरिकांमध्ये नाराजी आहे.

माझी मुलगी मैत्रई पेंडसे उद्यानात खेळायला जायची. पण खेळणी तुटलेली आणि खाली टाकलेले स्पंजसुध्दा तुटक्या अवस्थेत असल्याने खेळता येत नाही आणि भिती पण वाटते.
- सुप्रिया मोहिते, स्थानिक रहिवासी

सकाळी फेरफ टका मारण्यासाठी उद्यानात जातो. पण आतील दुरवस्था पाहून लोकं येणं कमी झालं आहे. या ठिकाणी प्रेमी युगुल, व्यसनी, उनाड मुलं बसलेली असतात. गवत व रोपं सुकली आहेत. बसण्याच्या बाकांवर फांद्या - पाचोळा टाकून ठेवला आहे. श्रेय घ्यायला सर्व येतात, पण देखभालीकडे मात्र कोणी लक्ष देत नाही.
- अजित सिंग, स्थानिक रहिवासी

जनतेच्या पैशांतून उदद्यानं बनवायची, पण राजकिय श्रेय मात्र नेते व नगरसेवक घेतात. मग आता पेंडसे आणि म्हाळगी उद्यानाच्या दुरवस्थेचं तसेच जनतेचा पैसा वाया गेला त्याची जबाबदारी पण या नेते व नगरसेवकांनी घ्यावी. तातडीने उद्यानांमध्ये दुरुस्ती करुन नागरिकांना त्यांच्या हक्काची चांगली उद्यानं द्यावी.
- सुनील कदम, कार्यकर्ता
 

Web Title: Arvind Pendse also came to the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.