जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 2, 2024 12:03 PM2024-02-02T12:03:56+5:302024-02-02T12:04:05+5:30

मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी "हा मार्ग माझा एकला' हे गाणे सादर केले. 

As long as there is Marathi language, Geetramayan will remain: Sridhar Phadke | जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके

जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके

ठाणे :  गीतरामायणमध्ये गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वर हे विलक्षण आहे. त्यातील प्रत्येक गीत वेगळे हे सतत जाणवत असते. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीतरामायण राहणार आहे असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त करत गीतरामायणाच्या दोन ओळी सादर केल्या. सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्रीधर फडके यांच्या “बाबूजी आणि मी” या विषयावरील मुलाखतीने. अनघा मोडक यांनी त्यांची मुलाखत घेतली. मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी "हा मार्ग माझा एकला' हे गाणे सादर केले. 

पुढे ते म्हणाले की, बाबुजींचे गाणे सपाट नव्हते. यावेळी त्यांनी त्यांच्या चालीचे वैविध्य सांगितले. त्यांनतर ' बाई मी विकत घेतला शाम' हे गाणे त्यांनी सादर केले. भावगीत सादर करताना गायकाने त्यातील भाव याचा अभ्यास करावा. भाव व्यक्त करणे हे जन्मजात यायला हवे मगच ते गाणे श्रोत्यांसमोर पोहोचते. मला जे गाण्यातले येते ते मी सर्वस्व ओतले पाहिजे ही वृत्ती असावी. भाव, शब्दोच्चार, लय, ताल हे सर्व त्या गाण्यात ओतले तर ते रसिकांपर्यंत पोहोचते. याबरोबरच परमेश्वराचे आशीर्वाद असावे लागतात. संगीतकार चाली कशा बांधतात हे सांगताना फडके म्हणाले की मराठीत आधी शब्द आणि मग चाल असे असते पण हिंदीत आधी चाल मग शब्द यावरून त्यांनी ' फुलले रे क्षण माझे फुलले रे' हे गाणे सादर केले. 

आम्ही संगीतकार गाणे तयार करतो पण ते किती लोकप्रिय होईल हे माहीत नसते. शेवटी परमेश्वराची साथ लागते. त्यानंतर त्यांनी ' ऋतू हिरवा, ऋतू बरवा'  हे गाणे सादर केले. मी जेव्हा गाण्याला चाल देतो तेव्हा ती आधी माझ्या मनाला पटली तर मी त्याची रेकॉर्डिंग करतो. अन्यथा ती चाल मी करत नाही. सुदैवाने मला चांगल्या गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे सांगताना त्यांनी आशा भोसले, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आरती अंकोलिकर यांचा आवर्जून उल्लेख केला.

Web Title: As long as there is Marathi language, Geetramayan will remain: Sridhar Phadke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे