दैव बलवत्त्तर म्हणून 'तो' खाडीत पडूनही सुदैवाने बचावला; पोलिसांनी वाचविले प्राण
By जितेंद्र कालेकर | Published: January 8, 2023 06:58 PM2023-01-08T18:58:48+5:302023-01-08T19:00:15+5:30
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागातील जोशी बेडेकर कॉलेजच्या मागे असलेल्या खाडीमध्ये एक तरुण पडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाली.
ठाणे - केवळ दैव बलवत्तर म्हणून राजा बाबू (२०, खारटन रोड, ठाणे, मुळ रा. हिमाचल प्रदेश) हा तरुण शनिवारी रात्रभर खाडीच्या दलदलीत पडूनही आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सुदैवाने बचावला. तो खाडीमध्ये अडकल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांकडून मिळाल्यानंतर रविवारी सकाळी या पथकाच्या जवानांनी त्याला खाडीतून सुखरुप बाहेर काढले.
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागातील जोशी बेडेकर कॉलेजच्या मागे असलेल्या खाडीमध्ये एक तरुण पडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना त्या भागात डुक्कर पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांकडून ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार विठ्ठल पाबळे यांनी ही माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांनी तसेच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी किनाºयापासून आतील खाडीच्या दलदलीमध्ये राजा बाबू हा अडकल्याचे आढळले. तो खाडीतील एका झाडाला धरुन कसाबसा स्वत:चा तोल सावरत होता. त्याला या पथकांनी मोठया कौशल्याने खाडीमधून बाहेर काढले. या घटनेत त्याच्या पाठीला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे यांनी दिली.
शनिवारी रात्रीच खाडीत अडकला
राजा बाबू शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान लघुशंकेसाठी खाडीच्या दिशेने गेला. त्याचवेळी तो अडकला. त्याला खाडीतील चिखल आणि दलदलीचा अंदाज न आल्यामुळे तो तसाच चिखलामध्ये रुतून राहिला. संपूर्ण रात्र या खाडीमध्ये काढल्यानंतर तो थंडीने पूर्णपणे गारठला होता. सुदैवाने, डुक्कर पकडण्यासाठी गेलेल्या काही तरुणांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि ही माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने मात्र या दलदलीतून रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सुखरुप बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचू शकले. ठाण्यात एका बांधकामाच्या ठिकाणी तो मजूराचे काम करीत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.