उल्हासनगर महापालिकेच्या कृत्रिम तलावात तब्बल १३ हजार ८०६ बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन
By सदानंद नाईक | Published: September 29, 2023 05:59 PM2023-09-29T17:59:50+5:302023-09-29T18:00:28+5:30
आयुक्त अजीज शेख यांचा जागता पाहारा
सदानंद नाईक, उल्हासनगर: पर्यावरणापूरक बाप्पाचे विसर्जन होण्यासाठी महापालिकेने विविध भागात एकून ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. नागरिकांनी आयुक्त अजीज शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने गणेश भक्तांच्या सोयीसाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शहरातील विविध भागात बाप्पांच्या विसर्जनासाठी ७ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. तसेच नदी, नाले, तलाव, विहीर आदी नैसर्गिक स्त्रोतात बाप्पांचे विसर्जन करण्या ऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी गणेशभक्त व नागरिकांना केले होते. नागरिकांनी आयुकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, शहरातील आयडीआय कंपनी, सेंच्युरी क्लब, हिराघाट बोट क्लब, संजय गांधी नगर रेल्वे स्टेशन, जिजामाता उद्यान, लाल चक्की चौक, कैलास कॉलनी चौक या ७ कृत्रिम तलावात एकून १३ हजार ८०६ बाप्पांचे विसर्जन मध्यरात्री पर्यंत झाले आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी जागता पहारा ठेवत, सर्वच कृत्रिम तलावाची सकाळ पर्यंत पाहणी केली. कृत्रिम तलाव परिसरात स्वच्छता, रस्त्यांची व्यवस्था, सुरक्षितता, निर्माल्य व्यवस्था, विद्युत व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी चहा, पाणी व अल्पोपहार आदींची महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली होती. आयुक्तांबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व इतर कर्मचारीही उपस्थित होते.