... तर १८८ नुसार कारवाई; पोलीस आयुक्तालय परिमंडळात तब्बल २६८२ होलिकांचे दहन
By अजित मांडके | Published: March 4, 2023 03:18 PM2023-03-04T15:18:06+5:302023-03-04T15:18:29+5:30
येत्या सोमवारी ६ मार्च रोजी आलेल्या होळीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ७ मार्चला धुळवड आली आहे
ठाणे : ठाणे, कल्याण ,भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात तब्बल दोन हजार ६८२ होलिकांचे दहन केले जाणार आहे. होळी आणि रंगपंचमीत(धुलीवंदन) रंगाचे बेरंग होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत, ४ हजार ३३ वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय, ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. याचबरोबर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर होळी, व रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा देताना, हे सण उत्साहाने आणि शांततेत साजरा करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
येत्या सोमवारी ६ मार्च रोजी आलेल्या होळीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ७ मार्चला धुळवड आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे या परिमंडळ हद्दीत सुमारे ५६१ सार्वजनिक व २१२१ खासगी अशा २ हजार ६८२ होलिका दहन होणार आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यामध्ये ०३ अप्पर पोलीस आयुक्तांसह ०७ पोलीस उपायुक्त, ११ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४०० पोलीस अधिकारी, ३ हजार पोलीस पुरुष व महिला अंमलदार तसेच शहर वाहतुक शाखेकडुन विविध महत्वाच्या चौकात ४२ पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, विशेष शाखेकडुन नागरी गणवेशात ७० अधिकारी व अंमलदारांचा समावेश असणार आहे.
या सण किंवा उत्सवाच्या दरम्यान विविध ठिकाणी धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरा करण्याकरीता नागरिक मोठया प्रमाणात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतील. त्यादृष्टीने त्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे, गर्दीच्या ठिकाणी व रहदारीच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. याशिवाय उत्सवा दरम्यान महिलांच्या अंगावर रंग किंवा पाणी फेकणे, महिलांची छेडछाड याचबरोबरीने विनयभंग होण्याची शक्यता लक्षात घेत. आणि रंगाचे व पाण्याचे फुगे मारल्याने होणारे अपघात, विहित मर्यादेपेक्षा अति उच्च आवाजात ध्वनी क्षेपकाचा होणारा वापर, गाण्यांच्या तालावर करणारे नृत्य, अंगविक्षेप करून गुलाल, रंग उधळण्याचे प्रकार लक्षात घेता ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी, उच्चभ्रु सोसायटी परिसर तसेच हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, लॉन्स या परिसरात नागरी गणवेशातील विशेष तपासणी पथके तैनात असतील. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील अनेक ठिकाणे सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत. त्याद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथके गस्त घालणार असून विशेष शाखेकडुन नागरी गणवेशातील पोलीसांच्या पथकांद्वारेही गस्त वाढवली आहेत. तर, खाडी किनारी जेट्टी लॅन्डीग पॉईन्ट भागात पोलिसांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाजांवर नजर ठेवण्याकरीता व कारवाई करीता भरारी पथके तयार करण्यात आलेले आहे.
पोलीसांशी संपर्क साधावा
या सण, उत्सवा दरम्यान महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी काही संशयीत हालचाली व संशयीत वस्तु दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीसांशी अथवा ठाणे शहर नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा.
कडक कायदेशीर कारवाई
उत्सवादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनी व वायूप्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उत्सवा दरम्यान मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द ब्रेथ अनालायझरचा वापर करून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
१८८ प्रमाणे होईल कारवाई
उत्सवा दरम्यान २८ फेब्रुवारी २०२३ अन्वये मनाई आदेश लागू केले असून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) चा भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड प्रक्रिया संहिता १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी हे सण, उत्सव उत्साहाने शांततेत साजरा करावे असे आवाहनही केले आहे.
" होळी,धुलिवंदन व रंगपंचमी सणाला नागरिकांची होणार गर्दी लक्षात घेऊन त्यादृष्टीने योग्य खबरदारी बाळगली आहे. त्याच तुलनेत चोख बंदोबस्तासह विशेष पथकेही तयार केली असून त्यांना गस्तीच्या सूचना केल्या आहेत. तसेच या सणाच्या शुभेच्छा देताना, ते सण उत्साहाने शांततेत साजरा करावा असे आवाहन केले आहे." - दत्तात्रय कराळे, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर