शहरातील तब्बल ३० ठिकाणांना दरड कोसळण्याची भीती; महापालिका बजावतेय केवळ नोटीस
By अजित मांडके | Published: June 17, 2024 02:57 PM2024-06-17T14:57:03+5:302024-06-17T15:08:29+5:30
दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २०२० मध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी ही २६ च्या आसपास होती. त्यानंतर २०२१ पासून ही संख्या १४ वर आली होती. मात्र यंदा पावसाळा सुरु होत असतांना ही संख्या थेट ३० वर गेली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांना संबधींत प्रभाग समिती मार्फत केवळ नोटीस बजावण्याची कारवाई केली जात आहे. मात्र याठिकाणी राहणाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असेही पालिकेने सांगितले आहे.
दुसरीकडे येथील घरे देखील रिकामी करण्यास रहिवासी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा देखील पालिकेने सुरवातीला यादी जाहीर केली होती. त्यात पूर्वीचीच म्हणजेच १४ ठिकाणेच होती. मात्र आता पालिकेने पुन्हा सर्व्हे करुन सुधारीत यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ही ठिकाणे आता तब्बल ३० एवढी झाली आहेत. याचाच अर्थ आधीच्या यादीत १६ ठिकाणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून कळवा प्रभाग समिती हद्दीत दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंब्रा भागातही अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीद्वारे सुरक्षितेची हमी मात्र पालिकेने दिलेली नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार असणार नसल्याचे पालिकेने सांगत आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे.दरम्यान, येथील रहिवासी देखील ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन कुठे जाणार असे सांगत घरे रिकामी करण्यास तयार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
ठाणे महापालिकेने जाहीर केलेली सुधारीत यादी
महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारीत यादीत वागळे प्रभाग समिती - ०४, वर्तकनगर - ०१, माजिवडा मानपाडा - ०३, कळवा - ०७, मुंब्रा - १५ आदी भागांचा यात समावेश आहे. याचाच अर्थ कळवा आणि मुंब्य्रातच दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा अधिक समावेश असल्याचे या यादीवरुन स्पष्ट होत आहे.