भाईंदर येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ९ हजार ९०० झाडांची कत्तल 

By धीरज परब | Updated: March 17, 2025 22:09 IST2025-03-17T22:09:36+5:302025-03-17T22:09:36+5:30

मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्यासाठी एमएमआरडीए ने गेल्या वर्षी सदर डोंगर पट्ट्यात असलेली  १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्याने ती काढून टाकण्याची परवानगी मीरा भाईंदर महापालिके कडे मागितली होती .

As many as 9,900 trees were cut down for the metro car shed in Bhayander. | भाईंदर येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ९ हजार ९०० झाडांची कत्तल 

भाईंदर येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ९ हजार ९०० झाडांची कत्तल 

मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो कारशेड साठी भाईंदरच्या डोंगरी येथील आणखी तब्बल ९ हजार ९०० झाडे हटवली जाणार आहेत . ह्या आधी मेट्रो कारशेड साठी १ हजार ४०६ झाडे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच मेट्रोकरशेड साठी एकूण थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ११ हजार ३०६ झाडांची धूळधाण केली जाणार आहे. 

मीर भाईंदर मेट्रो कारशेड उभारण्यास भाईंदर पश्चिमेस राधास्वामी सत्संग परिसर आणि मुर्धा ते मोरवा गाव दरम्यान मोकळी आणि खाजगी जमिन उपलब्ध होती. त्यातही मेट्रोकारशेड साठी मुर्धा ते राई दरम्यान आरक्षण टाकले गेले. ह्या खाजगी जागा होत्या आणि येथे झाडे नव्हती. परंतु ज्यांची रस्त्याच्या आरक्षणात घरे, घरापुढील अतिक्रमण जाणार म्हणून तसेच अनेकांच्या जमिनी जाणार म्हणून विरोध झाला. 

विरोधानंतर मेट्रोकारशेड साठी डोंगरी गावातील सरकारी जमीन व काही खाजगी जमीन  सर्वे क्र . १७ , १८ , १९ व २० पैकीच्या क्षेत्राची जमीन निश्चित केली गेली. मुळात हा डोंगर असून डोंगरावर कारशेडचा निर्णय होऊन महसूल विभागाने सदर सरकारी जमीन एमएमआरडीए ला हस्तांतरित केली आहे . डोंगरी भागात कारशेड करायचे ठरल्या नंतर येथे एमएमआरडीएने जमिनीचा ताबा घेण्यासाठी सर्वेक्षण केले . 

मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्यासाठी एमएमआरडीए ने गेल्या वर्षी सदर डोंगर पट्ट्यात असलेली  १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्याने ती काढून टाकण्याची परवानगी मीरा भाईंदर महापालिके कडे मागितली होती . एमएमआरडीएच्या मागणी नंतर महापालिकेच्या वृक्ष अधिकारी कांचन गायकवाड यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध करत  ८३२ झाडांची तोड तर ५७४ झाडे काढून अन्यत्र पुनर्रोपण केली जाणार असल्या बद्दल हरकती व सूचना मागवल्या . त्याला अनेकांनी हरकत घेतली. मात्र त्या हरकतींना अपेक्षे प्रमाणे केराची टोपली दाखवत पालिकेने १ हजार ४०६ झाडे काढण्यास परवानगी दिली. 

दरम्यान १ हजार ४०६ झाडे काढून त्या बदल्यात झाडे लावणार कुठे ? त्यासाठी नेमकी जमीन कोणती निश्चित केली ? याचे कोणतेच उत्तर एमएमआरडीए व पालिकेने अजून दिलेले नाही . त्यातच आता मौजे डोंगरी येथील सर्वे क्र . १७ / १ ते ९ ; १८/८ ; १९ व २० / १, २ अ व २ ब ह्या जमिनीतील तब्बल ९ हजार ९०० झाडे काढण्याची परवानगी एमएमआरडीएने महापालिके कडे मागितली आहे. महापालिकेच्या वृक्ष अधिकारी कांचन गायकवाड यांनी १२ मार्च रोजीच्या स्वाक्षरीने  त्या बाबतची सूचना सुद्धा जाहीर केली आहे. विशेष म्हणजे सदर सूचनेत झाडांवर पक्ष्यांची घरटी असल्यास कळवावे असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले आहे . 

इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल केल्याचा मोठा फटका निर्सगासह पर्यावरणास होणार आहे . आधीच शहरातील हवा प्रदूषित असून त्यात शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सातत्याने केली जात आहे . निसर्गाचा शिल्लक पट्टा देखील नष्ट करत राहिल्यास शुद्ध हवा , ऑक्सिजन मिळण्यावर सुद्धा परिणाम होणार असल्याची भीती जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत . तर पालिकेची जाहीर सूचनाच सदोष असून त्यात झाडांच्या प्रजाती , उंची , अंदाजे वय आदी बाबतीत कोणतीच माहिती त्यात दिली गेली नसल्याचा आक्षेप नेहमीच घेतला जात आहे . 

Web Title: As many as 9,900 trees were cut down for the metro car shed in Bhayander.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो