‘म्हाडा’चे घर लागताच आनंदाश्रूंना आला पूर; ठाण्यात ५,३११ सदनिकांची सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:53 AM2024-02-25T07:53:20+5:302024-02-25T07:53:28+5:30
कोकण मंडळाची सोडत गेल्या काही वर्षांपासून म्हाडा ठाण्यात काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश घरांचा या सोडतीमध्ये समावेश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाची ५ हजार ३११ सदनिका विक्रीची संगणकीय सोडत ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे शनिवारी संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडतीला प्रारंभ झाला. या सोडतीमध्ये सभागृहात उपस्थित असलेल्या विजेत्यांची संख्या आजवरच्या सोडतीच्या तुलनेत लक्षणीय होती. घर लागण्याकरिता दीर्घकाळ प्रतीक्षा केलेल्या काहींना लॉटरी लागताच आनंदाश्रू अनावर झाले.
कोकण मंडळाची सोडत गेल्या काही वर्षांपासून म्हाडा ठाण्यात काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश घरांचा या सोडतीमध्ये समावेश होता. अर्जदार अनेक महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी सोडत असल्याने अर्जदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोडतीची घोषणा जसजशी होत होती तसतशी उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. घर लागलेले अर्जदार आनंद व्यक्त करीत होते. सोडत विजेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन ‘म्हाडा’मार्फत अभिनंदन करण्यात आले. सोडतीत विजयी झाल्याचे एसएमएस येताच मंचावर जाण्यासाठी विजेत्यांची रांग लागली. ‘म्हाडा’च्या आजवरच्या ऑनलाइन सोडतीमध्ये सर्वाधिक विजेते यावेळी उपस्थित होते.
सरकारी कोट्यात घर मिळाले. म्हाडाच्या घरासाठी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने फॉर्म भरत होतो. आता घराची लॉटरी लागल्याने आनंद झाला. - गजानन शिंदे
सहा वर्षांपासून अर्ज करीत होते. नंबर लागत नसल्याने त्यांची निराशा झाली. मी पहिल्यांदा अर्ज केला आणि स्वप्नातील घर मिळाले. हे घर माझ्या पतीला भेट देणार आहे. - रश्मी मोरे
चार-पाच वर्षांपासून घरासाठी अर्ज भरत होतो. घराच्या लॉटरीसाठी सहा वेळा अर्ज केला होता. सातव्यांदा यश मिळाले, स्वप्नातील घर साकार झाले.
- श्याम वाटांबे, मुंबई उपनगर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय
नौदलाने अन्न आणि कपडे दिले; पण घरासाठी १० वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. आता लॉटरी लागली आहे. त्याबद्दल मी राज्य सरकारचा आभारी आहे.
- अजय तिवारी, नौदल अधिकारी
सरकारी कोट्यात घर मिळाले. गेल्या वर्षीच म्हाडात रुजू झालो. या वर्षी फॉर्म भरला आणि लगेच घर लागले याचा आनंद आहे.
- यशवंत कांगणे,
कनिष्ठ अभियंता, म्हाडा