जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची क्लिप व्हायरल होताच पालिका अधिकाऱ्याला मारहाण
By जितेंद्र कालेकर | Published: February 15, 2023 08:56 PM2023-02-15T20:56:20+5:302023-02-15T20:57:02+5:30
सहायक आयुक्त महेश आहेर यांचे कथित संभाषण: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शार्पशूटरला सुपारी दिल्याचे संभाषण असलेली ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथित आॅडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या आवारात आहेर यांना काही आव्हाड समर्थकांनी मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना पोलिस संरक्षणामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नौपाडा पोलिसांकडून सुरू होती.
आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण व्हायरल झाले. या संभाषणात आहेर यांनी आव्हाड यांचा उल्लेख ‘साप’असा केला असून, त्यांना ठेचण्याची भाषा केली आहे. या क्लिपमध्ये आहेर यांचे पोलिस संरक्षण काढले तेव्हा त्याच रात्री पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी सहपोलिस आयुक्तांना फोन करून आहेर यांच्या जिवाला आव्हाड यांच्यापासून धोका असल्याचे सांगितल्याचे खुद्द आहेर यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर यांना सांगून आव्हाड यांचे कुटुंब व त्यांना संपविण्याकरिता मोठी रक्कम मोजल्याचा उल्लेख केलेला आहे. ठाकूर व आहेर यांच्या व्यावहारिक संबंधांचीही या कथित क्लिपमध्ये चर्चा असल्याचे समजते.
महापालिका अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना संध्याकाळी ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. #thane#jitendraawhad#ncppic.twitter.com/pms1EOci7i
— Lokmat (@lokmat) February 15, 2023
अशा धमक्यांना घाबरत नाही :आव्हाड
अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलिस तक्रारही करणार नाही. कारण, पोलिस काही करणार नाहीत, हे माहीत आहे, अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी आहेर यांना ठाणे महापालिकेच्या आवारात गाठले. तिथेच त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिस संरक्षणात उपचारांसाठी नौपाडा पोलिसांनी दाखल केले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.