चिन्ह मिळताच 'तुतारी'च्या निनादात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव
By अजित मांडके | Published: February 23, 2024 02:46 PM2024-02-23T14:46:27+5:302024-02-23T14:47:39+5:30
लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने "तुतारी" हे चिन्ह दिले आहे. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले. तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आज पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळेस कार्यकर्त्याकडून "वाजता तुतारी... गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची, तुतारी वाजवणार.. गद्दारांना गाडणार , अशा घोषणादेखील देण्यात आल्या.
लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे. आता तुतारी हेच चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असून आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असे या प्रसंगी सुहास देसाई यांनी सांगितले. तर, विक्रम खामकर यांनी, तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे. कारण, जी चिन्हे मागितली होती; त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालविणे अधिक सोपे झाले आहे, असे सांगितले.
दरम्यान, यावेळेस मा.नगरसेविका आरती गायकवाड,विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,युवती अध्यक्षा पल्लवी जगताप,व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय,आरोग्य सेलचे अध्यक्ष आसद चाऊस,कार्याध्यक्ष सुभाष यादव,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.