माजीवडा पूलाच्या दुरुस्तीचे काम आठ तास लांबल्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप
By जितेंद्र कालेकर | Published: April 17, 2024 05:19 PM2024-04-17T17:19:54+5:302024-04-17T17:20:33+5:30
घोडबंदर ठाणे मार्गावरील माजीवडा ओव्हरब्रिजवरील एक्सपान्शन जॉईटसमधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम १६ एप्रिल पासून ते १७ एप्रिल रोजी पहाटेपर्यंत करण्यात येणार होते.
ठाणे: एकीकडे माजीवडा उड्डाणपूलावर एक्सपान्शन जॉईन्टसमधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम तब्बल आठ तास लांबणीवर पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभारामुळे बुधवारी भर उन्हामध्ये ठाणेकरांना सहा ते सात तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बुधवारी पहाटे ५ वाजता पूर्ण हाेणारे काम दुपारी १ वाजता पूर्ण झाल्यामुळे अनेक चालकांनी संताप व्यक्त केला.
घोडबंदर ठाणे मार्गावरील माजीवडा ओव्हरब्रिजवरील एक्सपान्शन जॉईटसमधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम १६ एप्रिल पासून ते १७ एप्रिल रोजी पहाटेपर्यंत करण्यात येणार होते. त्यासाठी घोडबंदरकडून माजीवडा उड्डाणपूलावरुन मुंबई जेएनपीटीकडे तसेच नाशिककडे जाणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रॉडवे पेट्रोल पंपासमोरील ब्रिज चढणीजवळ प्रवेश बंद केला होता. त्याऐवजी या वाहनांना पेट्रोल पंपासमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाउन कापूरबावडी सर्कल मार्गे जाण्यासाठीची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक शाखेने १३ एप्रिल रोजी काढली होती. त्यामुळेच १६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १७ एप्रिल २०२४ (बुधवारी ) रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत माजीवडा उड्डाणपूलावरील हा मार्ग बंद ठेवला होता.
प्रत्यक्षात काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम वेळेत पूर्ण झालेच नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम ११.३० वाजता अंशत: पूर्ण केले. परंतू, सिमेंटचा भाग सुका हाेण्यासाठी यात पुन्हा दीड तासांची भर पडली. दुपारी १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान हे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. परंतू, मुदतीपेक्षा तब्बल आठ तास विलंबाने हे काम पूर्ण झाल्याचा फटका सकाळी ठाणेकरांना बसला. सकाळी ७ ते दुपारी १ या सहा तासात या मागार्वर माेठया वाहनांसह नेहमीची वाहतूक आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे माेठी वाहतूक काेंडी झाली. त्यामुळे घाेडबंदर ते ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मागार्वर तसेच कापूरबावडी ते पातलीपाडा आणि मुंबई नाशिक महामार्गावर ढोकाळी-हायलँड रोडवर वाहनांच्या माेठया रांगा लागल्या हाेत्या.
कापूरबावडी चौकात पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल उभारला आहे. उड्डाणपूलावरील रस्त्याच्या दोन भागांमध्ये बसविलेली लोखंडी पट्टी बदलण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. बुधवारी राम नवमी असल्याने वाहनांची वर्दळ कमी असावी, असा अंदाज बांधून वाहतूक पोलिसांनी या विभागाला बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत ही परवानगी दिली होती. परंतू, कामाला उशीराने सुरूवात झामुळे पहाट उलटूनही काम सुरूच होते. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. उड्डाणपूल बंद असल्याने वाहने उड्डाणपूलाखालील रस्त्यावरून वाहतुक करू लागली. कापूरबावडी चौकात भिवंडी, कशेळी, बाळकूम, कोलशेत, हायलँड, मनोरमानगर भागातील वाहनांची वाहतुक कापूरबावडी चौकातून होते.
उड्डाणपूल बंद असल्याने कापूरबावडी चौकात वाहनांचा भार वाढून कोंडी झाली. काेंडीतून सुटण्यासाठी काही चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने नेली. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा ते खारेगाव टोलनाक्यापर्यंत कोंडी झाली होती. दुपारी १ वाजेच्या सुमारास उड्डाणपूलावरील वाहतुक सुरू झाली. त्यानंतर येथील कोंडी सुटली.
वाहतूक पाेलिसांची कसरत तर पीडब्लूडीचे फाेन बंद
वाहतूक काेंडी फाेडण्यासाठी भर उन्हात वाहतूक पाेलिसांची कसरत सुरु हाेती. तर कामाला विलंब झाल्याने पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांचे फाेन मात्र या काळात नाॅट रिचेबल झाल्याने गाेंधळात आणखीनच भर पडली हाेती.