बदलापुरात आशासेविकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:02+5:302021-06-21T04:26:02+5:30
बदलापूर : राज्यातील आशासेविकांनी १५ जूनपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बदलापुरातील आशासेविकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. ...
बदलापूर : राज्यातील आशासेविकांनी १५ जूनपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बदलापुरातील आशासेविकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शनिवारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ६२ हून अधिक आशासेविकांनी रुग्णालयासमोर जमून राज्य सरकारचा निषेध केला.
राज्य सरकारने आशासेविकांना तुटपुंजे मानधन देऊन त्यांची बोळवण केली आहे. कोरोनाच्या महाभयंकर साथीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी राज्य सरकारने दिलेली सर्व कामे केली. मात्र, सरकारकडून त्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जात आहे. सध्या सेविकांना अवघे सोळाशे पन्नास रुपये मानधन दिले जात असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा स्वयंसेविकांना सहा हजार रुपये मानधन देण्याचे कबूल केले होते. मात्र, सरकारने अद्याप मानधनात वाढ केलेली नाही. तसेच कोरोनाकाळात मिळणारा दोनशे रुपयांचा भत्ताही आता राज्य सरकारने बंद केला आहे. त्यामुळे सरकारने स्वयंसेविकांबाबत सकारात्मक विचार करून तातडीने योग्य मानधन द्यावे, या मागणीसाठी कामबंद आंदोलन करून राज्य संलग्न युनियनला पाठिंबा दर्शवला असल्याचे आशा स्वयंसेविकांनी सांगितले. राज्य पातळीवर निर्णय झाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.