Ashadi Ekadashi: वारी म्हणजे वेगळा आनंद असतो; माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:47 AM2020-07-01T00:47:01+5:302020-07-01T00:47:32+5:30

कोरोनाने आमचा वारीचा आनंद हिरावून घेतला. पण आता नाइलाज आहे. या वेळी पांडुरंगाला घरी राहूनच साकडे घालू. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करू.

Ashadi Ekadashi: Wari is a different kind of happiness; I am eager to visit Mauli, but ... | Ashadi Ekadashi: वारी म्हणजे वेगळा आनंद असतो; माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर, पण...

Ashadi Ekadashi: वारी म्हणजे वेगळा आनंद असतो; माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर, पण...

Next

ठाणे - ३१ वर्षांचा इतिहास ठाण्यातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या आषाढी दिंडी मंडळाच्या दिंडीला आहे. शिवाजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून वामन भोईर, दत्तात्रेय म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे व इतर वारकरी अशा आठ वारकऱ्यांनी मिळून तीस सुरुवात केली. ३२ वारकऱ्यांचा समावेश असलेली ही दिंडी १९८९ साली काल्हेर-कशेळी- बाळकुम-खारीगाव यामार्गे रवाना झाली होती. गेली ३१ वर्षे खंड न पडता ती याच मार्गे निघत असून आज यात २०० ते २५९ वारकऱ्यांचा समूह आहे.

माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर
वारीचे २८ वे वर्षे कोरोनामुळे हुकले. खास वारीसाठी मला रजा मिळत नसे. म्हणून मी एप्रिल-मे महिन्याची रजा राखून ठेवायचो. मी शासकीय अधिकारी असल्याने तीन आठवड्यांची रजा मंजूर होत नसे. त्यामुळे मी आजारी असल्याचे सांगायचो. ठाण्याहून आळंदीला बसने निघायचो. आळंदीहून माऊलीचे प्रस्थान निघायचे. प्रस्थान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन मी कधी चुकविले नाही. वारीदरम्यान शासकीय काम आले की तेवढे उरकायचो आणि ज्या ठिकाणाहून वारी सोडली तिथून ३० ते ४० किमी चालून माऊलीला गाठायचो. वारी म्हणजे वेगळा आनंद असतो. माऊलीची मोठी शक्ती सोबत असते. माऊलीला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत, पुढच्या वर्षीच्या वारीची वाट पाहत आहोत. - दिनकर पाचंगे, ठाणे

वारीतील खंड अत्यंत क्लेशदायी
४२ वर्षे माऊलीने माझ्याकडून पंढरपूरची वारी अखंड करून घेतली. सुदैवाने यात कधीही खंड पडला नाही. १९७७ साली मी पहिली वारी केली, तेव्हा मी फक्त ९ वर्षांचा होतो. ते पहिले वर्ष आईसोबत गेले. १९७७ साली मी आळंदी ते पंढरपूर वर्षभर वारी करणारे वारकरी नाना देशमुख यांच्या दिंडीमध्ये गेलो. तिथून सुरुवात झाली ती आजतागायत अखंडपणे सुरूच आहे. आजवर ज्या वारीमध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडला नाही, त्या वारीमध्ये यंदा कोरोनाचे सावट आले आणि खंड पडला. याचे मनापासून दु:ख वाटते. या दु:खाचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही. परंतु, संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत सांगायचे तर, जीवना वेगळी मासळी, तैसा तुका तळमळी.
- सुरेश कानडे, ठाणे

घरूनच करणार पांडुरंगाची प्रार्थना
माझी पहिली वारी १९४७ साली आईच्या पोटात असतानाच झाली. त्यानंतर मी ५ ते ६ वर्षे मावशीबरोबर जायची. माझा वारकरी संप्रदायात जन्म झाल्यामुळे घरातील वातावरण तसेच होते. १९६८ साली मी पहिली पायी वारी केली आणि त्यानंतर काही अडचणी सोडल्या तर ३५ वर्षे ती केली आहे. गेल्या वर्षी गुडघेदुखीमुळे जाता आले नाही. त्यामुळे यंदा वारीला जाण्याचा निश्चय केला होता. परंतु, कोरोनामुळे यंदाची वारी चुकली. घरात एखादी दुर्घटना घडल्यावर जितके वाईट वाटत नाही तितके वारी चुकल्याचे वाईट वाटते. यंदा आमची काय चूक झाली, की पांडुरंगालाच आमचा कंटाळा आलाय, असे प्रश्न मनात येतात. कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना घरातूनच पांडुरंगाला करणार आहे. - सुनंदा आढाव, ठाणे

वारीचे क्षण राहून राहून आठवतात
१९८७ सालापासून मी पंढरीच्या वारीला न चुकता जात आहे. आजवर माऊलीच्या दर्शनात कोणत्याच कारणामुळे खंड पडला नाही. पण यंदा कोरोनामुळे देवाचे दर्शन होणार नाही, माऊलीबरोबर जाता येणार नाही, याचे खूप दु:ख झाले आहे. दरवर्षीचे वारीचे सर्व क्षण आठवत आहेत. वारकºयांसोबतच्या आठवणी राहून राहून मनात येत आहेत. त्यामुळे वारी चुकल्याचे जास्तच वाईट वाटत आहे. वारीच्या आनंदाला यंदा कोरोनामुळे मात्र मुकावे लागले, कोरोनाने आमचा वारीचा आनंद हिरावून घेतला. पण आता नाइलाज आहे. या वेळी पांडुरंगाला घरी राहूनच साकडे घालू. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करू. - दत्ता वैद्य, ठाणे

Web Title: Ashadi Ekadashi: Wari is a different kind of happiness; I am eager to visit Mauli, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.