नियमात न अडकता पूरग्रस्तांना मदत, आशीष शेलार यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:25 AM2019-08-12T02:25:08+5:302019-08-12T02:25:51+5:30
कल्याण : पूरग्रस्तांना मदत करताना अधिकृत-अनधिकृत तसेच कोणत्याही शासकीय नियमांत अडकून न पडता नुकसान झालेल्या सर्वांनाच सरकार मदत करणार ...
कल्याण : पूरग्रस्तांना मदत करताना अधिकृत-अनधिकृत तसेच कोणत्याही शासकीय नियमांत अडकून न पडता नुकसान झालेल्या सर्वांनाच सरकार मदत करणार असल्याचे शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले.
कल्याणमधील पूरग्रस्त भागातील रहिवाशांशी रविवारी शेलार यांनी संवाद साधला. अनधिकृत घोषित करून काही पूरग्रस्त भागात प्रशासनाने सर्वेक्षण केलेले नाही. येथील असंख्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांना न्याय दिला जाईल, असे शेलार म्हणाले. येथील नागरिकांच्या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिला.
कल्याण पश्चिमेत मोबाइल मेडिकल उपचार केंद्राचे उद्घाटन शेलार यांनी केले. या केंद्रात पुढील १० दिवस मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष निधीतून साकारलेल्या साई उद्यानाचे (रोझाली) उद्घाटनही त्यांनी केले. कल्याणच्या वैभवात भर घालणारे हे उद्यान ठरेल, असे कौतुकही शेलार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा संघर्ष समितीसोबतही शेलार यांची बैठक झाली. नगरसेवक अर्जुन भोईर जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप सदस्यता अभियान आणि मतदारनोंदणी कार्यक्र म झाला. यावेळी आ. पवार यांच्या जनसंपर्ककार्यालयामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना शेगडीचे तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप झाले. यावेळी खासदार कपिल पाटील, कोळी महासंघ उपनेते देवानंद भोईर, नगरसेवक वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, भाजयुमो प्रदेश सचिव निखिल चव्हाण, परिवहन सदस्य कल्पेश जोशी, सदा कोकणे, हेमा पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
८० दिव्यांगांची पूरग्रस्तांसाठी १० हजारांची मदत
अपंग विकास महासंघाने केडीएमसीकडून मिळालेल्या अर्थसाहाय्यातून व्यवसाय सुरू करणाऱ्या ८० दिव्यांगांनी एक दिवसाची कमाई एकत्र करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० हजारांचा धनादेश शिक्षणमंत्री शेलार यांना सुपूर्द केला. यावेळी अशोक भोईर, गोरख नाईक, लक्ष्मण शिर्के यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप
गोविंदवाडी परिसरात पूर आल्याने अनेकांच्या घरांत पाणी घुसले होते. रविवारी शेकडो कुटुंबीयांना चार दिवस पुरेल इतका शिधा आणि चादरींचे वाटप करण्यात आले. सामाजिक भान जागृत ठेवून काम करणाºया लोकप्रतिनिधींची समाजाला कायम आपुलकी असते. राजकारण बाजूला ठेवून आ. पवार यांचे मदतकार्य कौतुकास्पद आहे, असे शेलार यावेळी म्हणाले.