उल्हासनगरात हद्दपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की
By सदानंद नाईक | Published: July 15, 2024 03:19 PM2024-07-15T15:19:34+5:302024-07-15T15:20:02+5:30
हद्दपारीचा भंग करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी जेरबंद करताच गुंडाने पोलिसांची कॉलर पकडून कपडे फाडल्याचा प्रकार उघड झाला.
उल्हासनगर : हद्दपारीचा भंग करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी जेरबंद करताच गुंडाने पोलिसांची कॉलर पकडून कपडे फाडल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात हद्दपार गुंडावर गुन्हा दाखल झाला असून रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता आयडीआय कंपनी जवळ सदर प्रकार घडला आहे.
उल्हासनगर इंदिरानगर तेजुमल चक्की परीसरात राहणाऱ्या सुरज उर्फ मॉन्टी अशोक सदानशिव या गुंडाला पोलीस परिमंडळाने बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे व रायगड जिल्ह्यतील पनवेल व कर्जत तालुक्यातून हद्दपार केले होते. रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता मॉन्टी आयडीआय कंपनी समोरील पडक्या घराजवळ पोलीस हवालदार सिद्धार्थ गायकवाड यांना दिसला. त्यांनी गुंड मॉन्टी याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मारण्यास धावून पोलीस हवालदार गायकवाड यांची कॉलर पडून धक्काबुक्की व हुज्जत घातली.
गायकवाड यांच्या शर्टाच्या बटन तुटून खिसा फाटला गेला. मॉन्टी याला ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. हद्दपारीचे उल्लंघन करून पोलिसां सोबत हुज्जत घालून बघून घेण्याची धमकी दिली. तसेच कपडे फाडण्या पर्यंत गुंडाची मजल गेली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक पोलीस करीत आहेत.