ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे; जयजीत सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:18 AM2023-12-12T05:18:17+5:302023-12-12T05:18:33+5:30
राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे : राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
जयजीत सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यांची २४ एप्रिल २०२३ रोजी महासंचालकपदी पदोन्नती झाली. मात्र, त्यांना ठाण्यातच ठेवले होते. डुंबरे हे १९९४च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात उपायुक्त आणि सहपोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
मितभाषी आणि स्पष्टवक्ता, अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सह-आयुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचे सह-आयुक्तपदही त्यांनी सांभाळले आहे. आस्थापना शाखेचे विशेष पोलिस महानिरीक्षक, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विशेष शाखा, तसेच कोसोवो या आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेतही त्यांनी काम केले आहे. एअर इंडिया कंपनीत त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.